कोयनेत धरणग्रस्तांनी केली होळी; शासनाच्या नावाने शिमगा करून केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:19 PM2023-03-06T19:19:14+5:302023-03-06T19:21:28+5:30
शासनाच्या नावाने शिमगा करून कोयनेत धरणग्रस्तांनी होळी केली.
निलेश साळुंखे
कोयनानगर (सातारा) : साताऱ्यातील पाटण येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आठ दिवसापासुन प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून शासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी होळी सणानिमित्त धरणग्रस्तानी आंदोलन स्थळी होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा करत निषेध व्यक्त केला. गेल्या आठवड्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री,पालकमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र असुन सुद्धा त्यांना धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळ मिळत नाही, हे जनतेचे सरकार आहे असे म्हणणारे कोयनेचे सुपूत्र असलेले मुख्यमंत्री धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर गंभीर दिसत नाहीत,इतर विषयांबाबत बैठकीसाठी वेळ आहे, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार स्थापनेपासून गेले आठ महिने त्यांना वेळ मिळाला नाही, यामुळे त्यांच्या दिरंगाई मुळे आज आम्हा धरणग्रस्तांना ऊन वारा, थंडीची तमा न बाळगता घरादाराची पर्वा न करता याठिकाणी आंदोलनास बसावे लागले.
सणवारही आंदोलनस्थळी साजरे करावी लागत आहेत ,असा आंदोलक धरणग्रस्तांनी आरोप करून आज सोमवारी आंदोलनाच्या आठव्या दिवशी डॉ भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होळी आंदोलन करून प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या दिरंगाईच्या विरोधात घोषणारूपी बोंब देऊन होळी साजरी केली. प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या विकासासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या घरी होळीचा सण साजरा न होता आंदोलनस्थळी होळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरी शासनाला सुबुध्दी येवो व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावेत यावेळी कोयना धरण ग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागले पाहिजेत, धरणग्रस्तांना उद्वस्त करणारा शासन निर्णय दुरूस्त झाले पाहिजेत. शंभर टक्के विकसनशील पुर्नवसन झाले पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी परंपरागत होळी सण आंदोलनस्थळी साजरा केला, यावेळी कोयना, वांग मराठवाडी, उरमोडी, तारळी प्रकल्पग्रस्त जनता हजारोंच्या संख्येने होळी आंदोलनात सहभागी झाली.
होलीका जशी जाळली तसे आम्ही जळणार नाही शासनाने आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये येत्या 15 मार्चपर्यंत आंदोलनकर्त्यांची बैठक घ्यावी. बळीराजाला व होलिकेला जसे फसवून मारले तसं आम्ही फसणार नाही. - कमल कदम धरणग्रस्त