Satara: यवतेश्वर घाट मार्गे प्रवास करताय? त्याआधी वाचा महत्वाची बातमी
By दीपक शिंदे | Published: July 22, 2023 12:28 PM2023-07-22T12:28:33+5:302023-07-22T12:29:14+5:30
यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड, महसूल, बांधकाम विभागाकडून पाहणी
सातारा : जिल्ह्यातील २२ गावांतील ३६९ ग्रामस्थांना भूस्खलन, दरड कोसळणे आदी धोकादायक कारणांमुळे तात्पुरत्या निवारा शेडमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासन, महसूल, बांधकाम विभागाकडून दुर्गम भागातील धोकादायक ठिकाणांची पाहणी झाली असून, यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड सोमवारी सकाळी ९ वाजता पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी रात्री बारापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रत्येक तालुक्यात आपतकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जेसीबी, पोकलॅन, वूड कटर यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील चाळकेवडी चिखली रस्त्यावर कोसळलेली दरड तातडीने काढण्यात आली. तसेच यवतेश्वर घाटात धोकादायक सुळका पाडण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भाेसले तसेच बांधकाम विभागाचे प्रशांत खेरमोडे यांनी पाहणी केली होती. यानंतर शनिवारी-रविवारी रहदारी जास्त असल्याने सोमवारी हा धोकादायक सुळका पाडण्यात येणार आहे.
हा सुळका घाट रस्त्यावर आदळून पायथ्यानजिकच्या शेतापर्यंत जाऊ शकतो. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी रात्री बारापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. धोकादायक ठिकाणांहून तात्पुरत्या निवारा शेडमध्ये हलवलेल्या नागरिकांना पुरेसे धान्य देण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी भूखंड आरक्षित करून त्याठिकाणी निवारा शेड बनवून वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, अन्नधान्याचा साठा उपलब्ध करण्यात येणार आहे.