शेकोटीसमोर बसलेल्या मनोरुग्णाचा होरपळून मृत्यू, साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: January 20, 2024 04:35 PM2024-01-20T16:35:40+5:302024-01-20T16:36:05+5:30
..अन् सातारकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
सातारा : वेड्याच्या भरात अंगावर वेगवेगळ्या कपड्यांच्या चिंध्या गुंडाळून शेकोटी शेजारी बसलेल्या मनोरुग्णाचा होपरपळून दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री राजवाडा परिसरात घडली. गोपाल विजयकुमार लकेरी (वय ४९, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजवाडा परिसरातून सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना अर्धवट जळालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे हे स्वत: कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हा प्रकार पाहता खून की आत्महत्या आहे, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
मृत गोपाल लकेरी यांचा भाऊ प्रवीण लकेरी याला घटनास्थळी आणल्यानंतर त्याचाच भाऊ असल्याचे त्याने ओळखले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ गोपाल हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले. त्याच्यावर पुणे येरवडा येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमर पाटील यांच्याकडे उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी त्याला साताऱ्यात घरी आणले होते. परंतु तो वेड्याच्या भरात घरातून निघून जायचा. अंगावर वेगवेगळ्या कपड्याच्या चिंध्या गुंडाळून शहरात तो दिवसभर फिरायचा.
दरम्यान, शनिवारी मध्यरात्री राजवाडा परिसरातील नगर वाचनालयासमोर गोपाल हा शेकोटी करून बसला होता. यावेळी त्यांच्या अंगावरील कपड्याच्या चिंध्यास आग लागली. यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. हा प्रकार मध्यरात्री घडल्यामुळे कोणाच्याही निदर्शनास आला नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
..अन् सातारकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
राजवाडा परिसरात एका व्यक्तीला जाळून मारून खून केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. भर वस्तीतच हा प्रकार निदर्शनास आल्याने मोठा पोलिस फाैजफाटाही घटनास्थळी दाखल झाला. आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर दुसरीकडे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू होते. काही वेळातच पोलिसांनी या प्रकरणातील वस्तूस्थिती समोर आणल्याने सातारकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.