राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात, साताऱ्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
By दीपक देशमुख | Published: January 10, 2024 12:11 PM2024-01-10T12:11:40+5:302024-01-10T12:11:56+5:30
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी ...
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. मुंबई येथील बैठकीत साताऱ्यातून खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सुनील माने, पाटणकर यांनी उमेदवारी मागितली तर माढ्यासाठी अभयकुमार जगताप इच्छुक आहेत. याशिवाय ऐनवेळी कोण उमेदवारीचा पत्ता बाहेर काढणार याचीही उत्सुकता आहे.
मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रभाकर देशमुख, कविता म्हेत्रे, मकरंद बोडके, डॉ. नितीन सावंत, डॉ. सतीश बाबर, ॲड. नीलेश डेरे, राजाभाऊ काळे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, सचिन जाधव, प्रशांत पवार उपस्थित होते.
खा. पवार यांनी दाेन्ही मतदारसंघातील पक्षाचा आढावा घेतल्यानंतर इच्छुकांची मते जाणून घेतली. यावेळी लोकसभेसाठी सुनील माने यांनी उमेदवारीची मागणी केली. ॲड. नीलेश डेरे यांनी लोकसभेसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीची, तर प्रशांत पवार, सचिन जाधव, सूरज कीर्तिकर यांनी सारंग पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली. माढा मतदारसंघातून प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी, तर माळशिरस मगरे या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली. लोकसभेसाठी इच्छुक वाढू लागले असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एवढ्या लवकर खा. शरद पवार यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी उमेदवार जाहीर करणार का? ऐनवेळी पत्ता जाहीर करणार याची उत्सुकता लागली आहे.
उमेदवार निवडताना लागणार कसोटी
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीला श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी समोर दिसत नाही. माढा मतदारसंघाचा विचार करता जिल्ह्यातील माण-खटावमध्ये भाजपचे, तर फलटण मतदारसंघ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. माढा विधानसभेत राष्ट्रवादी, सांगोला शिवसेना, माळशिरसला भाजप, तर करमाळ्यात अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार देताना कसोटी लागणार आहे.