कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली 

By नितीन काळेल | Published: July 24, 2023 01:25 PM2023-07-24T13:25:05+5:302023-07-24T13:25:22+5:30

पावसामुळे दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत

The discharge from Koyna Dam will start in the evening, the water inflow will increase | कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली 

कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली 

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे दाणादाण सुरू असून सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक २०१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयना धरणात पाण्याची मोठी आवक असल्याने ५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे अर्धे धरण भरले आहे. त्यातच साठा वाढल्याने पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रीय होऊन एक महिना झाला आहे. आतापर्यंत पश्चिम भागातच पावसाचा जोर दिसून आला. तर पूर्व भागाकडे प्रतीक्षा कायम आहे. आतापर्यंतच्या एक महिन्यात पश्चिमेकडील कोयना, नवजा, कास, बाणमोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून तर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे नवजासह महाबळेश्वरचा पावसाने तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरडी, झाडे कोसळू लागली आहेत. यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. तसेच पावसामुळे दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १५० मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २०१ आणि महाबळेश्वरला १८५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस हा नवजा येथे २,८७२ आणि महाबळेश्वरला २,७८२ मिलीमीटर पडला आहे. तर कोयनानगर येथे आतापर्यंत फक्त २,०६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणाणतील पाणीसाठ्यानेही रविवारी रात्री ५० टीएमसीचा टप्पा पार केला. 

तर सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५२ टीएमसी साठा झाला होता. या कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यामुळे धरण ५० टक्के भरलेले आहे. सध्या धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ६० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून १,०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास विसर्ग सुरू होणार आहे.

Web Title: The discharge from Koyna Dam will start in the evening, the water inflow will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.