Satara: महाबळेश्वरमधील ६३० एकर जमीन व्यवहार प्रकरण: आणखी आठजणांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:42 AM2024-06-19T11:42:42+5:302024-06-19T11:42:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात २० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६३० एकर जमीन व्यवहार प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आठजणांना कमाल जमीन धारणेंतर्गत नोटिसा काढल्या असून गुरुवार, दि. २० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात यापूर्वीही तीनजणांना नोटिसा बजावल्या होत्या तर ४० एकरांवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेशही दिले होते.
झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमिनीचा व्यवहार जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांना नोटीस काढली होती. याप्रकरणी ११ जून रोजी सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यादिवशी सुनावणी होऊन दि. २० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
परंतु याप्रकरणी सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आठजणांना कमाल जमीन धारणेंतर्गत नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये पूर्वीचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांच्याबरोबरच त्यांचे नातेवाईक रत्नप्रभा अनिल वसावे, दीपेश अनिल वसावे, संगीता चंद्रकांत वळवी, अरुणा बोंडाळ, गौतम मोहन खांबदकोन, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी, दीपाली दिलीप मुक्कावार यांनाही नोटिसा काढल्या असून दि. २० जून रोजी आवश्यक ती कागदपत्रे आणि लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
यादिवशी उपस्थित राहून कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.