जनता बँकेसाठी छाननीत पाच अपात्र; उपनिबंधकांनीही अपिल फेटाळले, २ जूनलाच चित्र स्पष्ट होणार
By नितीन काळेल | Published: May 30, 2023 07:11 PM2023-05-30T19:11:38+5:302023-05-30T19:11:53+5:30
निवडणूक रिंगणात अजूनही ३७ जण
सातारा : सातारा शहरवासीयांची अर्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बँक निवडणुकीत अपात्र केलेल्या पाचजणांचे अपिल जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळले. त्यामुळे त्यांच्यासमोर न्यायालयाचा पर्याय राहिला आहे. तर आतापर्यंत कोणीही उमेदवारी माघारी घेतलेली नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात अजूनही ३७ जण आहेत. तर २ जून माघारची शेवटची तारीख असल्याने त्याचदिवशी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
जनता सहकारी बँकेचीनिवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीत सर्वसाधारणमधून १६ जणांना निवडून द्यायचे आहे. महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गट १ आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे आहे. यासाठी सत्ताधारी भागधारक पॅनेलने पूर्ण पॅनेल निवडणुकीत उतरविले आहे. निवडणुकीत प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र ३७ जणांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वसाधारणधून निवडणूक रिंगणात २५ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये अरुणकुमार यादव, निशांत पाटील, रामचंद्र साठे, वजीर नदाफ, अतुल जाधव, विनोद कुलकर्णी, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, माधव सारडा, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, प्रकाश बडेकर, चंद्रकांत बेबले, मच्छिंद्र जगदाळे, शकील बागवान, नरेंद्र पाटील, सुवर्णादेवी पाटील, अक्षय गवळी, अशोक मोने, महेश राजेमहाडिक आणि रवींद्र माने यांचा समावेश आहे.
तर विमुक्त जातीमधून बाळासाहेब गोसावी यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आल्यातच जमा आहेत. तर इतर मागास प्रवर्गातून अशाेक मोने, श्रीकांत आंबेकर, चारुदत्त सपकाळ, शकील बागवान, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके हे पात्र ठरले आहेत. अनुसूचित जाती-जमाती राखीवमधून विजय बडेकर आणि प्रकाश बडेकर आहेत. महिला राखीवमधून सुजाता राजेमहाडिक, चेतना माजगावकर, सुवर्णादेवी पाटील हे पात्र ठरले आहेत. मागील आठ दिवसांपासून अर्ज माघारची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
या ५ जणांचे फेटाळले अपिल...
बॅंकेचा संचालक होण्यासाठी असणारा पात्रता निकष पूर्ण करण्यास पात्र नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी अर्ज छाननी दरम्यान, ६ जणांना अपात्र केलेले. त्यामधील पाचजणांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे अपिल केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर माळी यांनी पाचही जणांचे अपिल फेटाळले. सुरज अरुण यादव, संजयकुमार शंकरराव पवार, संजय दत्तात्रय सूर्यवंशी, सलीम राजमहमद बागवान आणि राजीव उत्तम शिर्के अशी संबंधितांची नावे आहेत.