अष्टप्रधान मंडळाच्या आठ स्तंभावर उभा राहणार सातारा पालिकेचा डोलारा, इमारतीत 'याचा' असणार अंतर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:48 PM2022-10-11T15:48:38+5:302022-10-11T15:49:03+5:30
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील आठ स्तंभ तयार करण्यात येणार असून या अष्टप्रधान मंडळाच्या आठ मजबूत खांबावर पालिकेची भव्य इमारत उभी राहणार आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाला प्रारंभ झाला असून, सदर बझार येथे तब्बल ४ हजार १०९ स्क्वेअर मीटर क्षेत्रात भव्य-दिव्य अशी नऊ मजली इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी १० मीटर खोदकाम केले जाणार असून, तीन वर्षांत ही इमारत मार्गी लावण्याचे विकासकाचे नियोजन आहे. यासाठी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील आठ स्तंभ तयार करण्यात येणार असून या अष्टप्रधान मंडळाच्या आठ मजबूत खांबावर पालिकेची भव्य इमारत उभी राहणार आहे.
नव्या प्रशासकीय इमारतीसाठी सदर बझार येथील एक एकर जमीन विनामोबदला पालिकेला देण्यात आली आहे. पुण्याच्या ‘विकास स्टुडिओ’ या कंपनीने इमारतीचा रेखांकन आराखडा तयार केला असून, या आराखड्यानुसार पालिकेची भव्य-दिव्य अशी नऊ मजली इमारत उभी राहणार आहे. या कामकाजाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून सध्या खोदकाम सुरू करण्यात आले आहे. ४ हजार १०९ स्केअर मीटर क्षेत्रात आतापर्यंत साडेसात मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, अजून अडीच मीटर खोदकाम केले जाणार आहे. यानंतर आरसीसी स्ट्रक्चर, फर्निचिंग आयटम, अप्पर व लोअर ग्राऊंड फ्लोअर अशी कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहे.
या इमारतीला एकूण नऊ मजले असून, त्यातील सहा मजल्यांवर प्रशासकीय कामकाज चालणार असून, खालच्या दोन मजल्यांवर वाहनतळ असणार आहे. नागरिकांच्या सतत संपर्कात येणारी कार्यालये ही पहिल्या तीन मजल्यांवर असणार आहेत. तर वरच्या मजल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती यांची दालने, कमिटी हॉल तसेच इतर कार्यालयांचे कामकाज चालणार आहे. २०२५पर्यंत ही इमारत मार्गी लावून पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे विकासकाचे नियोजन आहे.
इमारतीत याचा असणार अंतर्भाव
इमारतीच्या दर्शनी भागावर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे आठ स्तंभ, दर्शनी भागात शिवरायांचा पुतळा, वाहनतळ, सुसज्ज सभागृह, आर्ट गॅलरी, नगराध्यक्ष, सभापतींसाठी स्वतंत्र दालन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलर पॅनेल, लिफ्ट, कॅन्टीन, प्रदर्शन हॉल, कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस सेंटर यांचा समावेश आहे.
- इमारतीचे एकूण क्षेत्र : ४१०९ स्क्वेअर मीटर
- एकूण बांधकाम : १.५० लाख स्क्वेअर मीटर
- एकूण मजले : ९
- वाहनतळ : २ मजली
- पूर्णत्वाचा कालावधी : २०२५