कोरडी झालेली कोयना आनंदाश्रूंनी भरून जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:29 PM2022-07-01T12:29:31+5:302022-07-01T12:31:04+5:30
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते.
दीपक शिंदे -
सातारा : महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले शिंदे लहानपणापासून गावाकडेच होते. त्यामुळे त्यांची गावाशी आणि गावकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे. सध्या कोयना नदी कोरडी आहे, पण गावकऱ्यांना एवढा आनंद झाला आहे की ही नदी आनंदाश्रूंनी भरून जाईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते. या भागातील सर्वच लोकांची अशीच परिस्थिती आहे. कोयना धरणामुळे गावे विस्थापित झाली होती. जमीन पाण्याखाली गेल्याने उपजीविकेची फारशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष मुंबईला जाऊन नोकरी करत असे आणि आपल्या पगारातील पैसे मुंबईहून गावाला पाठवायचे त्यावर कुटुंबाची गुजराण करायची. एकनाथ शिंदे यांचे वडील मुंबईत होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आपले पुढील अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कुटुंबाला हातभार म्हणून वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालविण्याचे काम करत होते. एकनाथ शिंदेंना दोन भाऊ प्रकाश आणि सुभाष तर सुनीता नावाची एक बहीण आहे.
ठाणे परिसरात सातारा कॅम्प म्हणून रिक्षाचालकांची मोठी संघटना आहे. हे लोक एकमेकांच्या मदतीने रिक्षाचा व्यवसाय करतात. रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे गावाकडून मुंबईत ठाणे, गोरेगाव या भागात गेलेले अनेक लोक रिक्षा चालवितात आणि ते सर्व शिवसेनेशी बांधिलकी ठेवून असतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय करताना एकनाथ शिंदे यांची भेट आनंद दिघे यांच्याशी झाली आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यांच्या या निवडीनंतर गावातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
गावकऱ्यांनी केला होता मुख्यमंत्रिपदासाठी नवस
दरे तर्फे तांब या गावातील लोकांनी युतीचे सरकार आले त्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाला नवस केला होता. एकनाथ शिंदे यांचीही या देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवाच्या मंदिरात येऊन आनंदोत्सव साजरा केला.