चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटला, चालक ठार; नागरिकांनी पळवली कलिंगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:13 PM2022-04-06T19:13:04+5:302022-04-06T19:13:23+5:30
शिरवळ : चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना घडली. खंडाळा तालुक्यातील शिदेंवाडी गावच्या हद्दीत शिरवळ-भोर जाणा-या ...
शिरवळ : चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना घडली. खंडाळा तालुक्यातील शिदेंवाडी गावच्या हद्दीत शिरवळ-भोर जाणा-या महामार्गावर एका वळणावर हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश महादेव मदने (वय ३८, रा.नातेपुते ता. माळशिरस जि.सोलापूर ) असे मृत्यू टेम्पो चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर टेम्पोमधील कलिंगडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांनी तब्बल ५० हजाराची कलिंगडे पळवली.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नातेपुते जि.सोलापूर येथील राजवल्ली हिरालाल तांबोळी यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक (एमएच-१२-केपी-४९८६) वर उमेश मदने हे चालक म्हणून काम करत होते. दरम्यान, काल मंगळवारी (दि.५) टेम्पोमध्ये कलिंगडे भरून ते रायगड जिल्ह्यातील माणगाव याठिकाणी निघाले होते. यावेळी भोर-शिरवळ रस्त्यावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास चालक मदने याला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो उलटला.
यावेळी पाठीमागे असलेल्या टेम्पो चालक संतोष झेंडे यांनी व उपस्थित नागरिकांनी जखमी मदने यांना रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद संतोष झेंडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन वीर हे करीत आहेत.