Satara: चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली; पुण्याचे चौघे जखमी
By संजय पाटील | Updated: April 1, 2024 17:14 IST2024-04-01T17:14:24+5:302024-04-01T17:14:43+5:30
कऱ्हाड : कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेने निघोलेली कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन ...

Satara: चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली; पुण्याचे चौघे जखमी
कऱ्हाड : कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेने निघोलेली कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटकेटप्पा, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी हा अपघात झाला.
संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर भिसे (४५) व साक्षी शेलार (५३, सर्वजण रा. दह्यारी-हवेली, पुणे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
अपघातस्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दह्यारी-पुणे येथील चौघेजण कारमधून (क्र. एमएच १२ आरके ४०२१) नागरमुनोळीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी ते सर्वजण कारमधून पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले. संबंधित कार आटकेटप्पा येथे आली असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार महामार्गाच्या नव्याने बांधलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भिषण होती की, कारच्या समोरील भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला. तर कारमधील चौघे गंभीर जखमी झाले.
वाहतूक काहीकाळ विस्कळीत
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्गावरील प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तर दुपारी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार महामार्गावरुन बाजुला घेण्यात आली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.