Satara: चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डोंगरटेकडीला धडकला, चालकासह दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:19 AM2024-02-07T11:19:46+5:302024-02-07T11:24:14+5:30
कोयनानगर : पाटण तालुक्यातील ढाणकल गावाच्या हद्दीतील गुहागर-विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मालट्रकवरील वाहकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडील ...
कोयनानगर : पाटण तालुक्यातील ढाणकल गावाच्या हद्दीतील गुहागर-विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मालट्रकवरील वाहकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडील टेकडीला धडकला. या अपघातात चालक क्लिनर असे दोन जण जागीच ठार झाले. या अपघाताची कोयनानगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. लहू त्रंबक माने, अक्षय कांबळे, असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
कोयनानगर पोलिसांनी सांगितले की, गुहागर-विजयपूर महामार्गावर चिपळूणहून कऱ्हाडच्या दिशेने मालट्रक (एमएच ४२ एक्यू ९०९७) हा निघाला होता. तो पाटण तालुक्यात कोयना विभागातील ढाणकल गावाच्या हद्दीतील आला असता चिपळूण-कऱ्हाड मार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला.
यामुळे ट्रक थेट डाव्या बाजूकडील डोंगराच्या टेकडीला जाऊन धडकला. या अपघातात ट्रक चालक लहू त्रंबक माने (वय ३०) व क्लिनर अक्षय कांबळे (२७, दोघेही रा. डोंगरेश्वर पाटस, ता. दौंड, जि. पुणे) हे दोघेजण जागीच ठार झाले. ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अपघाताचा पंचनामा केला. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत.
डुलकीमुळे अपघाताची शक्यता
हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला आहे. रात्रभर सलग प्रवास करत असल्यास यावेळेत डुलकी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हा अपघातही चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.