साताऱ्यात आधी लगीन शिक्षक बँकेचे; मग सोसायटीचं!, शिक्षक प्रचारात दंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:53 AM2022-11-15T11:53:52+5:302022-11-15T11:54:20+5:30
जिल्हा बँकेची निवडणूक होत असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचीही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रमोद सुकरे
कराड: सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत आहे. त्याच्या प्रचाराचा धुरळा सुरू असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर आहे. त्यामुळे आधी लगीन बँकेचे मग सोसायटीचं त्यामुळे सोसायटीचे फक्त अर्ज भरून ठेवा उमेदवार निश्चितीचं नंतर बघू; अशीच भूमिका शिक्षक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसत आहे.
खरंतर प्राथमिक शिक्षक हा शासकीय कर्मचारी असल्याने त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचे संकेत आहेत. पण आता दस्तूर खुद्द त्यांच्याच अर्थवाहिनींच्या निवडणुका लागल्याने हे शिक्षक निवडणुकीच्या प्रचारात चांगलेच दंग झालेले आहेत. मात्र एका बाजूला जिल्हा बँकेची निवडणूक होत असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचीही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिक्षक बँकेला संधी न मिळालेले अनेक जण शिक्षक सोसायटीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र यातील कोणालाच दुखवायचे नाही ही भूमिका घेत शिक्षक नेत्यांनी अगोदर जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक होऊन जाऊदेत. त्यानंतर सोसायटी निवडणूक येते. त्याचे अर्ज दाखल फक्त करून ठेवा अर्ज माघारीला बरीच मुदत आहे. ते नंतर बघू अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे काही इच्छुक आनंदी दिसत असले तरी काही जण गॅसवर असल्याची चर्चा आहे.
सातारा जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघातील फूट कायम राहिलेली दिसते. शिक्षक नेते माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल रिंगणात उतरवले आहे. तर शिक्षक संघाचे दुसरे नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षक समितीला मदतीचा हात देत दुसरे पॅनेल उभे केले आहे.
त्यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता १९ नोव्हेंबरला त्यासाठी मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आरोप -प्रत्यारोपेच्या फैरी दररोज झडताना दिसत आहेत. आता गुलाल नक्की कोणाचा हे निकालानंतर स्पष्ट होईल.
कराड -पाटण तालुका शिक्षक सोसायटी निवडणुकीसाठी आत्तापर्यंत ३५० वर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. तर सोमवार अखेर १४० वर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल होतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेच्या निकालाचा होणार परिणाम
सातारा जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत असून त्याचा निकाल लगेच लागणार आहे .त्या निकालाचा परिणाम कराड शिक्षक सोसायटी निवडणूकीवर निश्चित होणार आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीने जिल्हा शिक्षक बँकेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे