पाऊस अन् थंडीचा सामना करत डोंगरातील वीजपुरवठा केला सुरळीत, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:13 PM2022-07-18T14:13:15+5:302022-07-18T14:49:49+5:30
मुसळधार पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तापोळा परिसरातील विजेचे २० खांब कोसळले होते
सातारा : काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तापोळा परिसरातील विजेचे २० खांब कोसळले. यामुळे वलवण, शिंदी व चकदेव या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाऊस, थंडीचा सामना करत १० खांब उभे करण्यात यश मिळवले. त्यामुळे लवकरच सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरु होणार आहे.
महावितरणच्या मेढा उपविभागांतर्गत तापोळा शाखा येते. परिसरातील १०५ गावांतील ५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे काम तापोळा शाखेचे कर्मचारी करतात. गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर पडले. परिणामी तापोळा वीज उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या शिंदी या २२ केव्ही वाहिनीचे २० लोखंडी खांब कोसळले. त्यामुळे शिंदी, वलवण आणि चकदेव या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. या गावात एकूण १३० ग्राहक आहेत. त्यांना तीन रोहित्रावरुन वीजपुरवठा केला जातो.
विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वाई उपविभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर व मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता सचिन बनकर यांनी तापोळा शाखेला विजेचे खांब, सर्व साहित्य व ठेकेदाराची दोन पथके पाठवली. तापोळ्याचे शाखा अभियंता सागर शेळके, स्थानिक वायरमन किरण माने व इतर कर्मचाऱ्यांसह वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
मात्र, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या वृक्षांमुळे व धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. यावरही मात करुन १० खांब उभे करण्यात यश आले आहे. रविवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे कामाची गती वाढली असून, लवकरात लवकर उर्वरित खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे व अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
दरवर्षी वीजपुरवठा खंडितच्या घटना...
सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा डोंगरदऱ्याचा आहे. कास, बामणोली, तापोळा या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी होते. तसेच वारेही वाहतात. त्यामुळे झाडे पडतात. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी महावितरणला सतत दक्ष राहावे लागते. तसेच वीजपुरवठाही सुरळीत करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.