सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडीची ख्याती पोहोचली भारतभर, ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:12 PM2024-08-27T16:12:22+5:302024-08-27T16:12:50+5:30
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : केंद्रीयस्तरावर घेतली दखल
सातारा : विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या व राज्यातील पहिले सौरग्राम ठरलेल्या मान्याचीवाडीची ख्याती आता देशभर पसरली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या ‘एक्स’ (ट्विटर) प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारने मान्याचीवाडीची माहिती आता देशाला दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ ऑगस्ट रोजी सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाचे ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ म्हणून लोकार्पण झाले होते. राज्यातील या कामाची दखल केंद्रीय अपारंपरिक मंत्रालयाच्या अखत्यारित ‘प्रधानमंत्री सूर्यघर-मोफत वीज योजनेच्या’ एक्स प्लॅटफॉर्मने घेतली असून मान्याचीवाडीने शून्य वीजबिलाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे संदेशात म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही मान्याचीवाडीची पहिले सौरग्राम म्हणून दखल घेतली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली मान्याचीवाडी तसे छोटेसे गाव आहे. या गावात एकूण वीज ग्राहकांची संख्या १०२ आहे. यामध्ये घरगुती ९७, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे प्रत्येकी एक तर सार्वजनिक सेवा वर्गवारीतील २ ग्राहकांचा समावेश आहे. गावचा वीजवापर दरमहा सरासरी साडेपाच हजार युनिटच्या घरांत असतो. यापूर्वी या गावाने महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेत छापील वीजबिल नाकारून सवलत घेतली होती. त्यामुळे मान्याचीवाडीचे उपक्रमशील सरपंच रवींद्र माने यांना महावितरणने प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजनेची माहिती दिली. सरपंच माने यांनीही त्यास प्रतिसाद दिला.
२५ जूनला ग्रामसभा घेत मान्याचीवाडीने सूर्यघर योजनेत १०० टक्के सहभाग घेण्याचा निर्धार केला. त्यासाठी लागणारी तांत्रिक गरज पूर्ण करत महावितरणने नवीन वीज रोहित्र उभारून क्षमतावाढ केली. प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविण्याचे ठरले आणि अवघ्या दीड महिन्यात गावातील १०२ वीज जोडण्या सौर ऊर्जेवर रूपांतरीत झाल्या.
महिन्याला १३ हजार युनिट वीजनिर्मिती
घरगुती वगळता पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालयासाठी जादा भाराची सौर प्रणाली बसविल्यामुळे गावाची सौर क्षमता १०९ किलोवॅट झाली आहे. एक किलोवॅटचा सौर संच महिन्याला साधारणत: १२० युनिट वीज निर्मिती करणार असून, गावात दरमहा १३ हजार युनिट वीज तयार होणार आहे. त्यामुळे गाव विजेच्या बाबतीत शंभर टक्के स्वयंपूर्ण झाले आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
इतर गावांनीही मान्याचीवाडीचा आदर्श घेऊन वीजबिल मुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकावे. यासाठी महावितरण गावागावांत घरोघरी सूर्यघर योजनेचा प्रसार करीत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.