ग्रामीण संस्कृतीचा बाज असणारी बैलगाडी अडगळीत.., बैलं राहिली शर्यतीपुरतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:32 PM2022-02-22T16:32:56+5:302022-02-22T16:34:02+5:30
झुंजूमुंजू झालं, चल हे सर्जा-राजा अशी साद.. बैलगाडीच्या चाकांची खडखड आणि बैलाच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज झाला दुर्मीळ
कुडाळ : झुंजूमुंजू झालं, चल हे सर्जा-राजा अशी साद.. बैलगाडीच्या चाकांची खडखड आणि बैलाच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज आता फारच दुर्मीळ ऐकायला मिळतो आहे. ग्रामीण भागातील शेतकरी राजाही आता आधुनिक झाला आहे. पूर्वीच्या काळात शेतीच्या कामासाठी पशुधनावर ज्याची मदार होती, त्याची जागा आता यंत्राने घेतली आहे. यामुळे पहाटेच्या प्रहरी सर्जा-राजाच्या जोडीसंगे जाणारी बैलगाडीही आता दुरापास्त झालेली आहे.
बदलत्या दुनियाबरोबर सर्वच क्षेत्रांत बदल घडून येत असून, ग्रामीण भागही याला अपवाद नाही. पारंपरिक पद्धतीचा साज आता यामुळे हळूहळू कमी होत चालला आहे. जिथं शेतीच्या प्रत्येक कामात बैलजोडी, बैलगाडीची मदत व्हायची, त्याची जागा मात्र आता यंत्राने घेतली आहे.
एक काळ असा होता, की गावात गाडीवान बैलगाडी आणि बैलाची जोडी म्हणजे मोठा मान असायचा. या गाडीवर आणि बैलाच्या जोडीवरच सारा संसार चालत होता. तेव्हा कुठेच मोटारगाडी नव्हती. गावाला जायचं म्हटलं की सर्वांनाच या गाडीचा आधार असायचा. कोण आजारी पडलं काय किंवा कुणाच्या लग्नाचं वऱ्हाड न्यायचं म्हटलं तर ही बैलगाडीच असायची. दूरवरच्या प्रवासही या गाडीनेच व्हायचा. यात मदत व्हायची ती बैलजोडीची अन् गाडीवाल्याचीच.
आज मात्र कालपरत्वे बदल घडून यंत्राचे युग आले आहे. या बैलगाडीच्या चाकाची जागा आता मोटारगाडीने घेतली आहे. दूरच्या प्रवासासाठी आता याचीच मोठी मदत होत आहे. पूर्वी मात्र प्रवासाबरोबरच, शेतीच्या कामालाही बैलगाडीशिवाय पर्याय नसायचा; पण आज याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रत्येकाच्या बांधावर पोहोचायला लागला आहे, हे जरी खरं असलं तरी अडचणीच्या ठिकाणी मात्र आजही बैलगाडीला तितकंच महत्त्व आहे.
काळाबरोबर आपण बदललो असलो तरी जुनं ते सोनं हे मात्र विसरता कामा नये. आज मात्र आपल्याला हा पारंपरिक ग्रामीण साज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून पाहायला मिळत असून, यातून खऱ्या अर्थाने या काळातील ग्रामीण संस्कृतीचा साज यांची ओळख नव्या पिढीला होण्यास मदत होणार आहे.
पूर्वीच्या काळी बैलगाडी हे एकमेव प्रवासाचे साधन होते. पशुधनावरच शेतीच्या कामाची मदार होती. आता शेतीचेही यांत्रिकीकरण झालेले आहे. यामुळे गावामध्ये बैलजोड्या नाहीत. बैलगाडीची जागाही यंत्राने घेतली आहे. यामुळे काळाच्या ओघात पूर्वीच्या काळातील ही बैलजोडी आणि गाडी मागे पडली आहे. यामुळे आता गावात ठराविक शेतकऱ्यांकडेच पारंपरिक यंत्रणा अजूनही पाहायला मिळत आहे. -विश्वास नवले, शेतकरी