कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी

By संजय पाटील | Published: April 13, 2023 01:12 PM2023-04-13T13:12:41+5:302023-04-13T13:13:33+5:30

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

The farmer fed a ton of brinjal to the animals, uprooted the trees and planted sticks | कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी

कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी

googlenewsNext

संजय पाटील

कऱ्हाड : शेतमालाला शाश्वत भाव नसल्याने अगोदरच शेतकरी हताश झालेत. त्यातच दराच्या चढ-उताराच्या फेऱ्यात आता वांगी उत्पादक शेतकरी सापडलेत. अचानक दर ढासळल्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्याने टनभर वांगी तोडून जनावरांना घातली; तर झाडे कापून त्यांना चक्क काडी लावली. कऱ्हाड तालुक्यातील अभयचीवाडीत शेतकऱ्याचा हा मन सुन्न करणारा हताशपणा पाहायला मिळाला.

अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने दहा गुंठे क्षेत्रात वांग्याचे पीक घेतले. वांगी हे बारमाही उत्पन्न देणारे पीक. त्यामुळे उत्पादनखर्च वजा जाता चांगला नफा मिळेल, अशी येडगे यांना अपेक्षा होती. जानेवारी महिन्यात त्यांनी वांग्याच्या रोपांची लागवड केली. त्यावेळी वांग्याला प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये दर होता. तो दर टिकून राहिला तर चांगला नफा मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे रघुनाथ येडगे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय जोमाने कामाला लागले.

गत पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी वांग्याचा पहिला तोडा केला. त्यावेळी दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांवर होता आणि आता अचानक दर चार रुपयांपर्यंत खाली आला. या दरातून वाहतूक खर्चही निघणे शक्य नसल्यामुळे हताश झालेल्या रघुनाथ येडगे यांनी शेतातील सुमारे टनभर वांगी काढून जनावरांसमोर टाकली; तर झाडे कापून बांधावर टाकत त्यांना काडी लावली.

घेतलेले कष्ट

  • रोपे विकत आणून त्याची लागवड
  • पाणी व्यवस्थापनासाठी केले ठिबक
  • रोपांची लागवड करताच खतांची मात्रा
  • तीन वेळा केली औषध फवारणी
  • दोन वेळा मजुरांकरवी केली भांगलण
  • वांगी तोडणीसह बाजारपेठेत वाहतूक


उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

रघुनाथ येडगे यांनी गत पंधरा दिवसांत सुमारे टनभर वांग्यांची विक्री केली. त्यांना २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यातून त्यांना सुमारे तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, त्यांनी रोपे विकत घेण्यापासून उत्पादन निघेपर्यंत केलेला खर्च तीस हजारांपेक्षा जास्त आहे.

दर मिळेल, या अपेक्षेने आम्ही वांगी आणि मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला थोडेफार पैसे मिळाले. मात्र, अचानक दर कमी आला. आता उत्पादन घेण्यात काहीच अर्थ नाही. वाहतूक खर्चही निघणार नाही. त्यामुळे मी वांग्याची झाडेच कापून काढली आहेत. - रघुनाथ येडगे शेतकरी, अभयचीवाडी, ता. कऱ्हाड
 

Web Title: The farmer fed a ton of brinjal to the animals, uprooted the trees and planted sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.