सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९०० कोटींचा मिळणार लाभ !
By नितीन काळेल | Published: September 7, 2022 05:20 PM2022-09-07T17:20:17+5:302022-09-07T17:20:56+5:30
सातारा : राज्य शासनाने नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोर्टलवर माहिती भरली जात आहे. ...
सातारा : राज्य शासनाने नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. तर या निर्णयाचा जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होऊन सुमारे ९०० कोटी रुपये मिळू शकतात.
राज्यात पावणे तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी दोन लाखांपर्यंत थकित पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना माफी जाहीर केली होती. त्यानंतर मार्च २०२० मध्ये राज्य शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी नियमीत कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा केली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आलेले. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांचे प्रमाणीकरण करुन संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.
जिल्ह्यात त्यावेळी ३ लाख ५३ हजार ३०३ शेतकरी पीक कर्ज घेणारे होते. यामधील ३ लाख १ हजार १९५ शेतकरी हे सातारा जिल्हा बँकेचे तर राष्ट्रीयकृत बँकेचे ५१ हजार १०८ कर्जदार होते. त्यावेळी दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या जवळपास ६४ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. या शेतकऱ्यांची सुमारे ४४५ कोटी थकित कर्ज रक्कम होती.
प्रोत्साहनचा यांना मिळणार लाभ...
आताच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे नियमीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील तीनपैकी दोनवर्षे शेतकरी थकबाकीदार नसावा अशी अट आहे. ५० हजारांपर्यंत हा लाभ मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्यांचे नियमीत पीक कर्ज २५ हजार असेल तर त्याला तेवढीच रक्कम मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंकिंग नाही, त्यांना लाभ दिला जाणार नाही.
नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या या कर्ज योजनेचा लाभ होईल. पात्र शेतकऱ्यांनी थंब इंम्प्रेशन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळू शकतो. - मनोहर माळी, जिल्हा उपनिबंध