मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी बाप भिडला; कऱ्हाडमधील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:30 PM2022-01-20T21:30:20+5:302022-01-20T21:31:30+5:30
चिमुकला जखमी; वडिलांनी हुसकावले बिबट्याला
मलकापूर/तांबवे : चिमुकल्यावर हल्ला करुन त्याला फरपटत नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याशी त्या मुलाचा बाप भिडला. बिबट्याशी झटापट करुन त्याने आपल्या चिमुकल्याला सुखरूप सोडवले. कऱ्हाड तालुक्यातील किरपे गावात गुरूवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
राज धनंजय देवकर (वय ५ वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, किरपे येथील धनंजय देवकर हे त्यांची पत्नी व मुलगा राज यांच्यासह गुरूवारी सायंकाळी ‘पाणारकी’ नावच्या शिवारात गेले होते. त्याठिकाणी वांगी तोडल्यानंतर धनंजय व त्यांच्या पत्नी खुरप्यासह इतर साहित्य पिशवीमध्ये भरत होते. तर राज त्यांच्यानजीकच खेळत होता. खाली पडलेले साहित्य तो वडिलांना पिशवीत भरण्यासाठी देत होता. त्यावेळी अचानकपणे पाठीमागून आलेल्या बिबट्याने राजवर हल्ला चढविला. राजची मान जबड्यात पकडून त्याने त्याला काही अंतरापर्यंत ओढले. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे सर्वजण घाबरले. मात्र, धनंजय यांनी सर्व बळ एकवटून बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी राजला आपल्या मिठीत पकडले. तसेच बिबट्यावर लाथाबुक्क्यांचा प्रहार केला. बिबट्या राजला ओढत तारेच्या कुंपणापर्यंत गेला. कुंपणाला धडकल्यामुळे आणि धनंजय यांनी राजला न सोडल्यामुळे बिबट्याने हिसडा मारुन राजची मान जबड्यातून सोडली आणि तेथुन नजीकच्या शिवारात धुम ठोकली.
या घटनेने परिसरात मोठी धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रविण तिकवडे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी याबाबत वन विभागाला कळवले. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी धावले. त्यांनी जखमी राजला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलवले. राजची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येणकेतील ‘त्या’ घटनेनंतर पुन्हा हल्ला!
किरपे गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असणाºया येणके गावात दोन महिन्यांपुर्वी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला केला होता. त्यामध्ये आकाश भील (वय ५ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला होता. तर घटनेच्या तिसºया दिवशी हल्ला करणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन वन विभागाने प्रकल्पात सोडले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बिबट्याने मुलावर हल्ला केल्यामुळे भितीचे वातावरण आहे.