पाचगणीतील पंचतारांकित द फर्न हॉटेल सील, इमारत रहिवासासाठी असताना केला व्यावसायिक वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:38 AM2024-06-01T11:38:31+5:302024-06-01T11:40:43+5:30
पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी येथील एका पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकाने प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून व्यावसायिक वापर केल्याने हे हॉटेल ...
पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी येथील एका पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकाने प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून व्यावसायिक वापर केल्याने हे हॉटेल आज पाचगणी नगर पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाने सयुक्तिक कारवाई करत सील केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी दुपारी पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर पाचगणी हद्दीतील हॉटेल फर्नवर पाचगणी नगरपालिका, पाचगणी पोलिस ठाणे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, महसूल विभाग या सर्वांचे विशेष कारवाई पथक आपल्या लवाजम्यासह दाखल झाले.
या हॉटेलच्या बऱ्याच तक्रारी महसूल, पालिका विभागाकडे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच कारवाईसाठी अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यामुळे काय कारवाई होणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या. या सर्व विभागाने दुपारनंतर हॉटेलमधील सर्व पर्यटक ग्राहकांना हॉटेलमधून बाहेर काढले. त्यानंतर कर्मचारी यांनाही बाहेर काढले आणि हॉटेलला सील केले.
याबाबत बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, संबंधित हॉटेलला याअगोदर अनेक नोटिसा दिल्या होत्या. संबंधितांना या हॉटेलचा वापर बंद करण्यास सांगितले होते. या इमारतीला रहिवासी वापरासाठी मान्यता होती, परंतु याचा वापर व्यवसायासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबद्दलची नोटीस पालिकेने देऊन त्यांची बांधकाम परवानगी रद्द केली होती. परंतु, वापर चालूच राहिल्यामुळे प्रशासनाने हे हॉटेल सील केले आहे.
आपण अनेक वेळा संबंधित हॉटेल मालकाला नोटीस दिली होती, परंतु तरीही याचा व्यावसायिक वापर हा चालू होता. हे अनधिकृत असून, माननीय हायकोर्टानेदेखील याला रेगुलर सेशनसाठी अर्ज प्रोसेस करायला आपल्याला सांगितले होते, परंतु संबंधित प्रोसेस न करता व्यावसायिक वापर चालूच राहिल्यामुळे आपण नोटीस देऊन हे हॉटेल आज प्रशासनातर्फे सील केलेले आहे, असेही जाधव यांनी सांगितले.