Satara: फलटणमध्ये उमेदवार बाजूलाच, नेत्यांमध्येच खरी लढाई; रामराजे अन् रणजितसिंह निंबाळकर आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:19 PM2024-10-19T12:19:34+5:302024-10-19T12:20:19+5:30
महाआघाडी अन् महायुती समोरासमोर ठाकणार
विकास शिंदे
फलटण : फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली पस्तीस वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले.
फलटण अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात दीपक चव्हाण तीन वेळा आमदार झाले. यावेळी त्यांचे तिकीट कायम राहिले आणि रामराजे यांनी राखून ठेवलेले डाव बाहेर काढले, तर दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होऊन इतिहास घडवतील.
रणजितसिंह यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. ते जनतेला किती रुचतात हेही तितकेच महत्त्वाचे.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?
१४ ऑक्टोबरला फलटण येथील भव्य सभेत संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. परंतु शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी या सभेत जाहीर केली नाही. त्यामुळे दीपक चव्हाण हेच शेवटपर्यंत उमेदवार असणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
२५५ फलटण विधानसभा
- एकूण मतदार - ३३८४६४
- पुरुष मतदार - १७२४५९
- स्त्री मतदार - १६५९९१
- इतर मतदार - १४
२०१९ विधानसभा निकाल
उमेदवार - मिळालेली - टक्केवारी
- दीपक चव्हाण - राष्ट्रवादी ११७६१७ - ५४.५५%
- दिगंबर आगवणे - भाजप ८६६३६ - ४०.१८%
- अरविंद आढाव - वंबआ ५४६० - २.५३%