Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा

By दीपक शिंदे | Published: July 8, 2024 07:14 PM2024-07-08T19:14:56+5:302024-07-08T19:23:23+5:30

टाळ, मृदंगही बोले विठ्ठल-विठ्ठल; माती कपाळी लावण्यासाठी झुंबड

The first standing rigan in Wari was staged in Satara district in the shouts of Mauli | Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा

Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा

सातारा :  रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी
               देह दंग सावळ्याच्या अंगणी
या भक्तिगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ-मृदुगांच्या गजरात विठ्ठल..विठ्ठल नामाचा उद्घोषात या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण दुपारी चार वाजता पार पडले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीतळावर आगमन केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला. मध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माउलींच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजविलेल्या रथात ठेवली व सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. माउलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर साऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना वेध लागले होते. ते उभ्या रिंगणाचे संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण, रिंगणाच्या उत्सुकतेने वारकऱ्यांची पावले भराभर चांदोबाच्या लिंबकडे पडत होती. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडील बाजूला असणाऱ्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड व कीर्तन रंगले होते.

माउलीचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला असता, गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला, तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतून हजारो वारकरी दुतर्फा झाले. अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालून वातावरणात अधिक प्रसन्नता आणली होती. रिंगण लावल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माउलींचा अश्व पुजाऱ्यांनी पळवत आणला.

सर्व दिंडीकरांचा टाळ-मृदंगाच्या आवाजात माउलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच, पळत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता-पाहता दोन्ही अश्वांनी माउलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यांपर्यंत नेल्यानंतर माघारी पळत आला.

माउलींच्या रथाजवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर, अश्वाने दौड घेतली. पुढे माउलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच, चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शविले. यानंतर सोहळा माउलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला.

माती कपाळी लावण्यासाठी झुंबड

अश्वास प्रत्यक्ष माउलींचा आशीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे. त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. ज्ञानोबा माउली-तुकाराम व पंढरीनाथाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते. अशा तऱ्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माउलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत गाजत तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगावात विसावला.

Web Title: The first standing rigan in Wari was staged in Satara district in the shouts of Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.