कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था
By दीपक शिंदे | Published: September 7, 2022 05:32 PM2022-09-07T17:32:18+5:302022-09-07T17:34:19+5:30
पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे
पेट्री : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिराने सुरू होत असून, चालू वर्षीचा हंगाम शनिवार दि. १० सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रतिपर्यटक शंभर रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी वीस रुपये शुल्क आकारले जाणार असून ऑनलाईन बुकिंगसाठी संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.
कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून, यावर्षी हंगामासाठी साधारणपणे १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
तसेच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृह, पिण्यासाठी मिनरल वॉटर याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर यासह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत फुलांचे गालिचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. त्यामुळे हंगाम जरी लांबला असला तरी हा हंगाम पुढे भरपूर काळ टिकणार असल्याचे कास पठार कार्यकारी समितीमधील अनुभवी प्रशिक्षक तसेच वनविभागातील जाणकार व अभ्यासू तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.
९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था...
हंगामाबाबत इतर नियोजनाबाबत येत्या ८ सप्टेंबर रोजी वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांची बैठक होणार असून, ९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून, जास्तीत जास्त पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करून यावे.