पावसाचा जोर ओसरला, कोयना धरण भरण्यास उशीर लागणार; महाबळेश्वरला फक्त १६ मिलीमीटरची नोंद
By नितीन काळेल | Published: July 11, 2023 12:34 PM2023-07-11T12:34:49+5:302023-07-11T12:35:10+5:30
धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला फक्त १६ तर नवजा येथे १७ मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणक्षेत्रातहीपाऊस कमी असून पाणीसाठा २२.७७ टीएमसी झाला आहे. मात्र, पाऊस कमी असल्याने यंदा धरण भरण्यास उशिर लागणार आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस अधिक पडतो. कोयनानगर, नवजा तसेच महाबळेश्वर येथे दरवर्षी ५ ते ६ हजार मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद होते. या पावसावरच प्रमुख धरणे भरतात. कारण, पश्चिम भागात सर्वात मोठे धरण कोयना असून पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यानंतर धोम धरणाची पाणी साठवण क्षमता १३.५० टीएमसी आहे. तर कण्हेर धरण १०.१०, उरमोडी ९.९६, तारळी ५.८५ तर बलवकडी धरणाची क्षमता ४.०८ टीएमसी इतकी आहे.
पश्चिम भागात पाऊस पडलातरच ही धरणे भरतात. यंदा मात्र, पावसाने उशिरा सुरूवात केली आहे. तरीही अजून पावसाचा जोर नाही. त्यातच सध्या उघडझाप सुरू असल्याने धरणातही कमी पाणी येत आहे. यामुळे यंदा धरणे भरण्यास उशिर लागणार आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वरला १३६८ मिलीमीटरची झाली. त्यानंतर नवजा येथे १२५७ तर कोयनानगर येथे अवघा ८८५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा २२.७७ टीएमसी झाला झाला आहे. त्यातच पाऊस कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७५७५ क्यूसेक वेगाने पाणी आवक होत होती. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.