Satara: कृष्णा नदीपात्रातील ‘वीर मारुती’ मंदिराचा भराव उद्ध्वस्त!, डागडुजीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:53 PM2024-11-28T12:53:09+5:302024-11-28T12:54:38+5:30
संजय पाटील कऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड ...
संजय पाटील
कऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड निखळले असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे दगड वाहून गेले आहेत. त्याबरोबरच मंदिराभोवती दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे भविष्यात मंदिराला मोठा धोका निर्माण होणार आहे.
कृष्णा नदीपात्रात प्रीतीसंगमापासून पूर्वेला वीर मारुतीचे मंदिर आहे. त्यालाच ‘मढ्या मारुती’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पूर्णपणे पात्रात आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर तसेच टेंभू प्रकल्पात पाणी अडवल्यानंतर हे मंदिर पाण्यात जाते. वर्षातील किमान आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. मात्र, सध्या नदीची पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. नदीचे पाणी सैदापूरच्या बाजूने प्रवाहित होत असून, वाळवंट पूर्णपणे रिकामे झाले आहे. त्यामुळे या मंदिरात भाविक दर्शनासाठी जात आहेत.
नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे या मंदिराचा दगडी भराव मोकळा झाला असून, या भरावाची झालेली दुर्दशा दिसून येत आहे. भरावाचे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. त्यामुळे पाया पूर्णपणे खचला आहे. दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. त्या बाजूचे सिमेंटही उखडले असून, हा पाया पुन्हा भरून मजबुतीकरण न केल्यास भविष्यात मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१८३८ मध्ये उभारले मंदिर
- कृष्णा नदीतील वाळवंटात सैदापूर बाजूला १८३८ मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली होती.
- राघोपंत आपटे यांनी नारायण रामचंद्र कुर्लेकर, विठोबा अण्णा दप्तरदार, हरीभट बापूभट वळवडे यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधले.
- दगडी चिरेबंदी असलेले हे मंदिर खोडशीच्या धरणानंतर नदीचा प्रवाह बदलल्यामुळे कऱ्हाडच्या वाळवंटात आले.
- पुरामुळे हानी होऊ नये, अशी योजना मंदिर बांधणीवेळी केली आहे. मात्र, सध्या या मंदिराच्या भरावाचे दगड निखळले आहेत.
वीर मारुती तथा ‘मढ्या मारुती’
कृष्णा नदीपात्रात असलेल्या या मंदिराजवळच पूर्वी दहन संस्कार केले जात होते. त्यामुळे त्याला ‘मढ्या मारुती’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, बाबुराव गोखले यांनी मित्र मंडळाच्या सहाय्याने त्याला ‘वीर मारुती’ असे प्रयत्नपूर्वक म्हणण्यास सुरूवात केली. पुढे तेच नाव प्रचलित झाले.
नैसर्गिक आपत्तीमुळे कृष्णा नदीतील वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव खचला आहे. दगड निखळले आहेत. प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी मंदिराच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत. तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड