साताऱ्यातील ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने प्रारंभ, रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल
By सचिन काकडे | Published: January 5, 2024 01:50 PM2024-01-05T13:50:41+5:302024-01-05T13:51:14+5:30
सातारा : रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या चार दिवसाच्या अक्षर समारोहाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ही ...
सातारा : रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या चार दिवसाच्या अक्षर समारोहाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ही ग्रंथदिंडी गांधी मैदानावरून राजपथ मार्गे जिल्हा परिषद मैदानावरील साहित्यिक डॉ. विश्वास मेहंदळे नगरीकडे मार्गस्थ झाली.
ग्रंथपालखी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा तसेच विविध साहित्य संपदा ठेवण्यात आली होती. अरुण म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर ग्रंथ पालखी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी ‘मराठी साहित्याचा विजय’ असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्या शाळा, रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालय, हिंदवी पब्लिक स्कूल, मोना स्कूल, सुशिलाबाई साळुंखे जुनिअर कॉलेज तसेच न्यू इंग्लिश स्कूल इत्यादी शाळांचे चित्ररथ या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले.
कन्या शाळेने ‘अंधश्रद्धा पसरवू नका’ हा उदबोधक संदेश देणारा चित्र रथ सादर केला. रयत शिक्षण संस्थेने सावित्रीबाई फुले यांचा देखावा सादर केला. सुमारे आठशे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवी अरुण म्हात्रे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाहक शिरीष चिटणीस, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलचे संचालक अमित कुलकर्णी, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र शेजवळ, साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, ज्येष्ठ कला शिक्षक चंद्रकांत ढाणे, समन्वय समितीच्या सुनिता कदम, प्रल्हाद पार्टे, विनायक लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.