शासनाने बांधून ठेवलंय धरण; धरणामुळे झालंय आमचं मरण!, कोयना धरणग्रस्त महिलांनी मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:12 PM2023-03-13T16:12:04+5:302023-03-13T16:12:21+5:30
‘मायबाप सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन ६४ वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावा,’ अशी आर्त हाक
कोयनानगर : काळजाचं होतंय पाणी पाणी, धरणग्रस्तांची ऐकून कहाणी, ‘बाई मी धरण धरण बांधते, माझं मरण मरण कोंडते, शासनाने बांधून ठेवलंय धरण, धरणामुळे झालंय आमचं मरण,’ अशा विविध स्फूर्तिगीतांनी रविवारी कोयना नदीकाठावरील आंदोलनस्थळ परिसर दुमदुमून गेला होता.
श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली कोयनानगर येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून, रविवारी आंदोलनाचा १४वा दिवस होता. मात्र, या आंदोलनाची अद्यापही शासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलक धरणग्रस्त गीतांतून गाऱ्हाणे मांडत सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत.
कोयना नदीकाठावरील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कोयनेसह वांग-मराठवाडी, तारळी, उरमोडी प्रकल्पाचे धरणग्रस्त हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. धरणग्रस्तांचा उत्साह वाढवत प्रकल्पामुळे झालेल्या स्थितीचे वर्णन धरण स्फूर्तिगीतांतून सरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहेत.
‘मायबाप सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन ६४ वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावा,’ अशी आर्त हाक धरणग्रस्त महिला-भगिनी या गीतांतून देत आहेत. गत चौदा दिवस घर, संसार सोडून दिवसरात्र न्याय मागण्यासाठी बसलेल्या प्रकल्पग्रस्तांकडे लक्ष देत नाही, असा आरोप आंदोलन धरणग्रस्त करत आहेत. दरम्यान, रविवारी कोयना विभागातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोयनामाई सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत मोहिते, पंकजनाना गुरव, सचिन कदम, श्रीपती माने, महेश शेलार, दाजी पाटील, सीताराम पवार, राजाराम जाधव, संदीप जांभळे, अनिल सुतार, परशुराम शिर्के, आकाश कांबळे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.
वनविभागाच्या कार्यालयावर आज मोर्चा...
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर निगडित विषयांवर सोमवारी सकाळी रासाटी येथील कोयना वन्यजीव कार्यालयावर धरणग्रस्त आंदोलकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आली.