..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:26 AM2023-01-02T11:26:26+5:302023-01-02T11:28:17+5:30
राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू
सातारा : ‘राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली असल्याने अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढविणार आहे. त्यामुळे राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस न दाखवता सतत पुढे-पुढे ढकलत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
सातारा येथे काँग्रेस समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील सरकार राहणार की जाणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदार करायचे आहेत; पण अंतर्गत वादामुळे त्यांची निवड करता येत नाही. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अतिवृष्टीतील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही तेच कळत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू
विकासात राज्य मागे पडत आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. त्यातच सरकारवर विश्वास नसल्याने अनेक प्रकल्प राज्यात येत नाहीत, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ‘काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरत आहे. लवकरच ती संपणार असून, त्यानंतर काँग्रेस देशात ‘हात जोडो’ अभियान सुरू करत आहेत. महाराष्ट्रातही या अभियानाची तयारी सुरू आहे.