महायुतीने लोकसभेचे रणशिंग फुंकले; सातारा-माढा मतदारसंघावर फोकस

By नितीन काळेल | Published: January 12, 2024 07:41 PM2024-01-12T19:41:29+5:302024-01-12T19:41:37+5:30

घटकपक्षाचे नेते एकत्र : उद्या महामेळावा; सातारा, माढ्यात खासदार निवडूण आणण्याचा निर्धार

The Grand Alliance blew the Lok Sabha's trumpet; Focus on Satara-Madha Constituency | महायुतीने लोकसभेचे रणशिंग फुंकले; सातारा-माढा मतदारसंघावर फोकस

महायुतीने लोकसभेचे रणशिंग फुंकले; सातारा-माढा मतदारसंघावर फोकस

सातारा : लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्याने महायुतीची महत्वाची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी युतीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. तसेच यामध्ये साताऱ्यात रविवारी होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले. तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.

सातारा शहरात दि. १४ जानेवारीला महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीतील घटकपक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच भाजपचे विक्रम पावसकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भीमराव पाटील यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार कोण यापेक्षा आघाडी किंवा महायुती भक्कम दाखविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली होती. त्यानंतर महायुतीनेही आम्हीही मागे नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या अनुषंगानेच युतीतील नेत्यांची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीतून एकी दाखविण्याचा प्रयत्न झाला. तसेच याच बैठकीत साताऱ्यात रविवार, दि. १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याचे ठिकाण आणि दिशा ठरविण्यात आली.

या बैठकीनंतर युतीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये साताऱ्यातील गांधी मैदानावर दि. १४ जानेवारी रोजी दुपारी चारला महायुतीचा महामेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात लोकसभेला ४५ पेक्षा अधिक खासदार निवडूण आणले जाणार आहेत. तसेच सातारा आणि माढ्याचा खासदारीही महायुतीचा करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवर महायुतीत एकी आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील गावागावांतही एकी दाखवून देऊ असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच लोकसभेला उमेदवार कोण असणार हे महत्वाचे नाही. यापेक्षा राज्यस्तरावरील बैठकीत उमेदवार निश्चित होईल, त्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत काम केले जाईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

तिघांचाही साताऱ्यावर दावा; कोणाला मिळणार मतदारसंघ

महायुतीत भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आहे. तसेच रिपाइं (आठवले गट) आहे. भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तिघांनाही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे. भाजपने तर दोन वर्षांपासून तयारी केली आहे. त्यातच मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यावर दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनीही युतीत मतदारसंघ आमच्याकडे असल्याचे सांगत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा वाटपात मतदारसंघ कोणाकडे जातो हे नंतर ठरणार आहे. पण, त्यापूर्वी सर्वजण एकत्र आले आहेत हेही महत्वाचे ठरलेले आहे.

Web Title: The Grand Alliance blew the Lok Sabha's trumpet; Focus on Satara-Madha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.