वादळी वाऱ्याचा ढेबेवाडी खोऱ्याला तडाखा, घरांचे पत्रे गेले उडून; केळी बागांचेही नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:05 PM2022-04-07T16:05:21+5:302022-04-07T16:05:40+5:30
अचानक जोराच्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचा फटका मत्रेवाडी, निवी, कासणी, उमरकांचन, जिंती, मराठवाडी, भोसगाव या गावांना बसला आहे
सणबूर : ढेबेवाडी विभागाला वादळी पावसाचा तडाखा बसला असून मत्रेवाडी, ता. पाटण येथे घराचे पत्रे उडून दोन कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. तर जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने विभागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून वैरणीच्या गंजी उडून गेल्या आहेत. तसेच केळीच्या बागा पडून मोठे नुकसान झाले आहे. भोसगाव येथे बाभळ रस्त्यावर पडल्याने जिंती भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
काल, बुधवारी सायंकाळी अचानक जोराच्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचा फटका मत्रेवाडी, निवी, कासणी, उमरकांचन, जिंती, मराठवाडी, भोसगाव या गावांना बसला आहे. मत्रेवाडी येथे धोंडीबा यशवंत मत्रे, सदाशिव यशवंत मत्रे यांच्या घराचे पत्रे उडून जाऊन घरातील साहित्य भिजले व घराची भिंतही कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.
भोसगाव येथे गणपती मंदिराजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडले, यामुळे जिंती भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मराठवाडी परिसरात झाडे उन्मळून पडली आहेत. या परिसरात वादळाच्या तडाख्याने वीजही गायब झाली आहे. भोसगाव येथे केळीच्या बागांनाही वादळी तडाखा बसून मोठे नुकसान झाले आहे.