साताऱ्यात आढळला दुर्मीळ बेडूक तोंड्या पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:03 PM2023-04-01T18:03:28+5:302023-04-01T18:03:45+5:30
श्रीलंकन फ्रॉग माऊथ किंवा बेडूक तोंड्या या शिकारी पक्ष्याचा आवास साताऱ्यातील जंगलात
सातारा : सातारा भागातील जंगल अत्यंत वैविध्यपूर्ण असून त्यामध्ये असणाऱ्या प्राणी व पक्षांचा आवास हा निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरच येथील अन्नसाखळी व निसर्ग साखळी अवलंबून आहे. साताऱ्यातील जंगलांमध्ये सर्व शिकारी पक्षी आढळून येतात. श्रीलंकन फ्रॉग माऊथ किंवा बेडूक तोंड्या या शिकारी पक्ष्याचा आवास साताऱ्यातील जंगलात आढळून आला आहे.
हे पक्षी मुख्यत्वे कोकण भागात तसेच कोयना परिसरात आढळून येतात. सातारा भागातून याची नोंद नव्हती. अनेक वर्षे शोध घेत असताना मार्च महिन्यात या पक्षाच्या आवाजावरून याला शोधण्यात सागर कुलकर्णी यांना यश आले व सातारा भागातील जंगलाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. हे पक्षी घुबडासारखे वाटत असले तरी ते रातवा या पक्ष्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. यांच्या आहाराचे छोटे उंदीर, बेडूक, साप, सापसुरळ्या, छोटी वटवाघळे आणि काही कीटक यांचा समावेश आहे.
नर अत्यंत गडद रंगात, तर मादी तांबूस रंगात आढळून येते. वाळलेल्या पानांमध्ये झाडावर हे लपून जातात. निशाचर असल्याने रात्री यांची हालचाल पाहायला मिळते. तसेच बेडूक तोंड्या हे डिसेंबर महिन्यात घरटे करून दोनपर्यंत पिल्लांचे संगोपन करतात. अत्यंत अशा दुर्मीळ पक्षाचा वावर आपल्या जंगलात आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच या सर्व जंगलांचे सरंक्षण होण्याची मागणी निसर्गमित्रांकडून केली जात आहे.
भटकंतीच्या निमित्ताने विविध पक्षी आणि प्राणी आढळून येतात. असाच हा दुर्मीळ पक्षी जंगलातील भटकंतीत आढळून आला. सह्याद्रीच्या पर्वत रांगात असे अनेक पक्षी आढळतात. - श्रीकांत वारुंजीकर, निसर्गमित्र.