उन्हामुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बसला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:49 PM2022-06-02T16:49:35+5:302022-06-02T16:50:00+5:30

चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते.

The heat hit the soybean crop, a blow to farmers dreams | उन्हामुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बसला झटका

उन्हामुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बसला झटका

Next

नितीन काळेल

सातारा : चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते. मात्र, कडक उन्हामुळे फुलगळ होऊन उत्पादन, तसेच दर्जावरही परिणाम झाला, तर परिपक्व सोयाबीन नसल्याचा फायदा घेत व्यापारीही कमी दराने खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मालामाल होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम महत्त्वाचे असतात. यामध्ये खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. या हंगामातील ऊस वगळून जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर राहते, तर सोयाबीन ६३ हजार, भात ४९ हजार, भुईमूग ३८ हजार, ज्वारी २४ हजार, मका १८ हजार आणि नाचणी ६ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र राहते. आतापर्यंत खरीप हंगामातच सोयाबीनचे पीक घेण्यात येत होते; पण बदलत्या काळात शेतकरी आता वर्षात ‘डबल बार’ उडवून देऊ लागले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६३ हजार हेक्टर असले तरी त्यामध्ये वाढ होत आली आहे. गेल्या पाच वर्षांत खरीप सोयाबीन क्षेत्रात जवळपास १५ हजार हेक्टरची वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी खरिपात ७४ हजार हेक्टरवर पेरणी झाली, तर खरिपानंतर उन्हाळ्यातही ९ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेऊन ‘डबल बार’ उडवून दिला होता. या तालुक्यांत १,७६१ हेक्टरवर पीक होते. यामध्ये माण आणि महाबळेश्वर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांत सोयाबीन होते. यावर्षी कडक उन्हाळा होता. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादित सोयाबीन लहान राहिल्याने दर्जा राहिला नाही. परिणामी व्यापारी कमी दराने मागत आहेत.

सध्या खरिपातील सोयाबीनला ६,५०० पर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर उन्हाळी सोयाबीनची ५,५०० ते ६ हजारांपर्यंत विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे, तसेच मोठ्या अपेक्षेने उन्हाळ्यात सोयाबीन घेऊनही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह मावळला आहे.

उन्हाळी सोयाबीन क्षेत्र  तालुका क्षेत्र हेक्टरमध्ये
सातारा                  ४८५
जावळी                 २१
पाटण                   ३५
कऱ्हाड                 २१६
कोरेगाव                १३०
खटाव                  १५१
फलटण                 ३७६
खंडाळा                 ८७
वाई                     २६०


शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन पीक घेतले होते; पण, कडक उन्हाळ्यामुळे फुलगळ झाली, दर्जावर परिणाम झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापारी उन्हाळी सोयाबीनला कमी दर देत आहेत. वास्तविक पाहता सोयाबीन तेलाचा दर अजूनही तेजीत आहे. त्यामुळे सोयाबीनला कमी दर मिळणे शेतकऱ्यांचा तोटा आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: The heat hit the soybean crop, a blow to farmers dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.