साताऱ्यात उन्हाचा कडाका वाढला, पारा पोहचला 'इतक्या' अंशावर
By नितीन काळेल | Published: February 24, 2023 04:40 PM2023-02-24T16:40:30+5:302023-02-24T16:41:13+5:30
यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता
सातारा : फेब्रुवारी महिन्यातही थंडीची तीव्रता जाणवते. पण, याच महिन्यात सातारा शहराचा पारा ३६ अंशावर गेला आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात साडे महिने थंडीचे राहिले. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीला सुरुवात झाली. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही थंडी होती. पण, कडाक्याच्या थंडीचा अनुभव जिल्हावासीयांना आलाच नाही. सतत किमान तापमान कमी-जास्त होत होते. त्यामुळे कधी पारा २० अंशांपर्यंत जायचा. तर काहीवेळा १३ अंशांपर्यंत खाली येत होता. तापमानातील या चढ-उतारामुळे लोकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत होता. एकसमान पारा कधीच राहिला नाही. मात्र, जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर सातारकरांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागला.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शहराचे किमान तापमान सतत काही दिवस १० ते १२ अंशादरम्यान राहिले. यावेळी एक दिवस पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात तापमान वाढत गेले. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात चढ-उतार सुरू झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात सातारा शहराचे कमाल तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत राहते. त्यातच थंडीही जाणवते. ही थंडी मार्च महिना उजाडला तरी असते. यंदा मात्र, उन्हाळ्याला लवकरच सुरुवात झालेली आहे. यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. तर रात्री उकाड्याशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.