साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे होणार पुनरुज्जीवन, ‘जिज्ञासा’ने उलगडला ‘अजिंक्यतारा’चा इतिहास

By सचिन काकडे | Published: April 18, 2023 06:05 PM2023-04-18T18:05:46+5:302023-04-18T18:06:05+5:30

स्थापत्यावरून त्याचे बांधकाम शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाले असावे असा अंदाज

The historic stone cage in Satara will be revived, Jigyasa Foundation reveals the history of Ajinkyatara | साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे होणार पुनरुज्जीवन, ‘जिज्ञासा’ने उलगडला ‘अजिंक्यतारा’चा इतिहास

साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे होणार पुनरुज्जीवन, ‘जिज्ञासा’ने उलगडला ‘अजिंक्यतारा’चा इतिहास

googlenewsNext

सातारा : जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात मंगळवारी वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत सहभागी विद्यार्थी व नागरिकांना ‘जिज्ञासा’ संस्थेच्या सदस्यांनी किल्ले अजिंक्यतारा नावाचा प्रवास उलगडून दाखवला. यावेळी मंगळाई देवीच्या आवारात असलेल्या जंगली श्वापद पकडण्याच्या ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्पही करण्यात आला.

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून सातारा स्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व महाराणी येसूबाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारसा सहल आयोजित करण्यात आली. यंदाची वारसा सहल क्रांती स्मारक चार भिंती व अजिंक्यताराच्या डोंगर उतारावर असलेल्या मंगळाई मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली.

आपल्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व वृद्धिंगत व्हावे, यासाठी हा वारसा दिन साजरा करण्यात येतो; परंतु आपल्याच अनास्थेपाई काही गोष्टी नामशेष होताना दिसून येतात. अशीच एक घटना किल्ले अजिंक्यताराच्या पूर्व उतारावर असलेल्या मंगळाई मंदिराजवळ जंगली श्वापदे पकडण्यासाठी बांधलेल्या दगडी पिंजऱ्याच्या बाबतीत घडली.

हा पिंजरा इतिहासकाळात बांधला होता. त्याच्या काळासंबंधीचा निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी त्याच्या स्थापत्यावरून त्याचे बांधकाम शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाले असावे, असे दिसते. अशा या ऐतिहासिक गोष्टींचे संवर्धन व्हावे, असे आवाहन वारसा सहलीच्या माध्यमातून करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दगडी पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस व्यक्त केला.

या दगडी पिंजऱ्याच्या अनुषंगाने ‘मेरी’ संस्थेचे प्रवर्तक मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी ‘वन्यजीव व मानवी वसाहतींचा इतिहास’ याबाबत मार्गदर्शन केले. वारसा सहलीसाठी जिज्ञासाच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच कला व वाणिज्य कॉलेजचे प्रा. राजेंद्र सातपुते, प्रा. गौतम काटकर तसेच लालबहादूर शास्त्री कॉलेजचे प्रा. दीपक जाधव, प्रा. प्रतिभा चिकमठ, डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

राज्यकर्त्यांची दूरदृष्टी

दगडी पिंजऱ्याच्या पुढील बाजूस काही अंतरावर एक नैसर्गिक झरा आहे. त्या झऱ्यावर एक छोटे व एक मोठे अशी दोन पाण्याच्या टाक्या आहेत. साहजिकच त्यावेळी या पाणवठ्यांवर जंगली श्वापदे येत होती. त्यांचा उपद्रव रयतेस होऊ नये म्हणून त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून हा पिंजरा बांधला असावा, असा कयास आहे.

महाराष्ट्रातील अनमोल वारसा...

एखादे भुयार असावे, अशी या दगडी पिंजऱ्याची रचना होती. कधीकाळी त्यांच्या तोंडाशी वर-खाली सरकरणारे लोखंडी दार देखील असावे; परंतु कालौघात यांची बरीच वाताहत झाली. आजघडीला हे आगळेवेगळे स्थापत्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीची रचना अजून तरी आढळून आली नसल्याने सातारकरांसाठी हा एक अनमोल वारसा ठरत होता.

साताऱ्याचा अनमोल ठेवा असलेल्या ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे संवर्धन होणे इतिहास टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. - सुहास राजेशिर्के, माजी उपनगराध्यक्ष

Web Title: The historic stone cage in Satara will be revived, Jigyasa Foundation reveals the history of Ajinkyatara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.