Satara: वाहन बाजूला घेण्यास सांगितले, हॉटेल मालक, व्यवस्थापकाला १०-१५ तरुणांनी चोपले; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:53 PM2024-09-21T19:53:31+5:302024-09-21T19:54:25+5:30
मुराद पटेल शिरवळ : हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम चोपले. ...
मुराद पटेल
शिरवळ : हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम चोपले. तलवार फिरवत शिवीगाळ, काठ्या, हाँकी स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. सागर पोपट जाधव (वय ३७) व एकनाथ पोपट शिंदे अशी जखमींची नावे आहेत. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पुणे, सातारा जिल्ह्यातील पंधरा जणांविरोधात शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिदेंवाडी गावच्या हद्दीत लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर पोपट जाधव (वय ३७) यांच्या कुंटूंबियांचे हॉटेल व बिअरशॉपी आहे. काल, शुक्रवार हॉटेलसमोर मोकळ्या जागेमध्ये एका ट्रकचालकाचा वाद सुरु होता. दरम्यान सागर यांनी संबंधितांना हॉटेलसमोरील वाहन बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी संबंधित चालकाने शिवीगाळ केली. तसेच सायंकाळी १०-१५ तरुणांना घेवून पुन्हा हॉटेल समोर आला. व्यवस्थापक एकनाथ शिंदे यांनी सागर जाधव यांना फोनवरुन माहिती देताच ते हॉटेलमध्ये आले.
यावेळी संचित शिळीमकर, सौरभ शिळीमकर, विनीत शिळीमकर, अमोल शिळीमकर (सर्व रा.ताबांड ता.भोर जि.पुणे), सौरभ पिसाळ (पिसाळवाडी ता.खंडाळा), ऋषी कोंडे व इतर आठ ते नऊ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करुन काठ्या, हाँकी स्टिक, टाँमीने सागर जाधव व एकनाथ शिंदे यांनाही बेदम मारहाण करीत हॉटेल व बिअर शॉपीची तोडफोड केली. यात सागर जाधव, एकनाथ शिंदे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.