फलटणला आयकरच्या चौकशीचे गुऱ्हाळ संपले, शंभर तासानंतर संजीवराजेंना दिलासा 

By दीपक शिंदे | Updated: February 10, 2025 11:34 IST2025-02-10T11:32:50+5:302025-02-10T11:34:49+5:30

कार्यकर्त्यांचा जल्लोष

The Income Tax Department's case against Sanjivraje Naik-Nimbalkar and Raghunatharaje Naik-Nimbalkar ended after 100 hours. | फलटणला आयकरच्या चौकशीचे गुऱ्हाळ संपले, शंभर तासानंतर संजीवराजेंना दिलासा 

फलटणला आयकरच्या चौकशीचे गुऱ्हाळ संपले, शंभर तासानंतर संजीवराजेंना दिलासा 

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘सरोज व्हिला’या घरात गेल्या पाच दिवसांपासून प्राप्तीकर विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू होती. ही तपासणी शंभर तासांनंतर रविवारी रात्री पूर्ण झाली. तपासणी अधिकारी फलटणमधून गेले आहेत.

दरम्यान, तपासणी पूर्ण झाल्यानंतर संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘प्राप्तीकर विभागाने पहिल्या दिवशी कागदपत्रांची तपासणी केली. गोविंद मिल्क किंवा सरोज व्हिला या ठिकाणी त्यांना काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. किंवा काहीही जप्त केले नाही. आलेले सगळे आधिकारी माघारी गेले आहेत. आमची कोणतीही खाती गोठवली नाहीत. त्यांनी गोविंद मिल्कच्या कामकाजाचे कौतुक केले. पथकातील अधिकऱ्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य केले त्याचप्रमाणे त्यांची वर्तणूकही चांगली होती.

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण येथील सराेज व्हीलामध्ये बुधवार, दि. ५ पासून प्राप्तीकर विभागाने तपासणी सुरू केली. तपासणी संपतच नसल्याने संजीवराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. संजीवराजे यांनी शनिवारी स्वतः सरोज व्हीलच्या प्रवेशद्वारावर येऊन कार्यकर्त्यांना तपास पूर्ण झाला आहे, आपण उद्या सकाळी भेटू’, असे म्हटले होते मात्रही कारवाई सुरूच असल्याने निवासस्थानाबाहेर बसणारे कार्यकर्ते अस्वस्थ दिसत होते. काही निष्ठावंत पहिल्या दिवसापासून घराबाहेर ठाण मांडून आहेत. तपासणी कधी पूर्ण होईल, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

उंचपुऱ्या अधिकाऱ्यांचा दरारा

सरोज व्हिला, गोविंद मिल्क व इतर ठिकाणी झालेल्या छाप्यात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा चांगलाच दरारा जाणवत होता. सहा ते साडेसहा फूट उंचीची हे अधिकारी तासनतास चौकशी करत होते. संजीवराजे यांच्या व्यवसायातील भागीदारांचीही चौकशी या ठिकाणी सुरू होती. बाहेर असणाऱ्या कुणाचा कधी नंबर लागेल हे सांगता येत नव्हते.

गोविंद मिल्कचे कामकाज सुरळीत

छापाच्या पहिल्या दिवसापासून कोळकी येथील गोविंद मिल्कचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. या ठिकाणी चौकशी सुरू आहे असे बाहेरून वाटत नव्हते. कामगार त्यांचे त्यांचे काम करत होते. मात्र प्रवेशद्वारावर विशेष काळजी घेतली जात होती. माजी आमदार दीपक चव्हाण हे स्वतः सामान्य कार्यकर्त्यांत पाचही दिवस बसून होते.

Web Title: The Income Tax Department's case against Sanjivraje Naik-Nimbalkar and Raghunatharaje Naik-Nimbalkar ended after 100 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.