सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

By नितीन काळेल | Published: July 26, 2024 12:56 PM2024-07-26T12:56:51+5:302024-07-26T13:00:04+5:30

महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान, कोयनेत ८१ टीएमसी पाणीसाठा

the intensity of rain has slowed down In Satara district, discharge from the dam continues; Tourist places closed  | सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ तर कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर झाला. तर कोयना धरणातील पाणीसाठाही ८१ टीएमसीवर पोहोचला आहे. तरीही सध्या जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातून विसर्ग सुरूच आहे. तर पश्चिमेकडील पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावर बंदी करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवस जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे संततधार होती. अनेक भागात धो-धो पाऊस कोसळल्याने दुर्गम भागातील रस्त्यावर झाडे कोसळली. दरडी पडण्याचेही सत्र सुरूच होते. त्यातच धरणातून विसर्ग आणि ओढे-नाल्यांना पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, गुरूवारी रात्रीपासून पावसाचा जोर मंदावला आहे. शुक्रवारीही प्रमाण कमी राहिले. यामुळे अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. तसेच नियोजित विसर्गही थांबविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास संबंधित धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे १७२ आणि महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७८ हजार ४८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८१.१९ टीएमसी झालेला. सध्या धरण ७७.१४ टक्के भरले आहे. धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि सहा दरावाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोयनेच्या दरवाजातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता. पण, पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने विसर्ग वाढ थांबविण्यात आली आहे.

ठोसेघर, सडा वाघापूर, भांबवली धबधबा बंद..

हवामान विभागाने ३० जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि आॅरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्याही पाऊस होत आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार धबधबा तसेच सर्व पाॅईंंट. पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा), सडावाघापूरचा उलटा धबधबा. सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा, जावळी तालुक्यातील एेकीव धबधबा सुरक्षिततेच्या कारणाने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे.

कण्हेरमधील विसर्ग कमी; धोममध्ये ७० टक्के साठा..

वाई तालुक्यातील धोम धरणक्षेत्रात पाच दिवस तुफान पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार होता. पण, पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्यातही घट झाली असल्याने पावसाची तीव्रता पाहून आता धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. तर सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातील विसर्ग १० हजारवरुन साडे पाच हजार क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.

Web Title: the intensity of rain has slowed down In Satara district, discharge from the dam continues; Tourist places closed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.