Satara: दिवसात कोयनेला १३९ मिलीमीटर पाऊस; धरणात साडे पाच हजार क्यूसेकने आवक सुरू

By नितीन काळेल | Published: June 21, 2024 06:58 PM2024-06-21T18:58:59+5:302024-06-21T19:00:13+5:30

गतवर्षी पाऊस अन् पाणीसाठाही कमी..

The intensity of rain increased in Satara district, Navaja 148 mm while Mahabaleshwar recorded 74 mm rain | Satara: दिवसात कोयनेला १३९ मिलीमीटर पाऊस; धरणात साडे पाच हजार क्यूसेकने आवक सुरू

Satara: दिवसात कोयनेला १३९ मिलीमीटर पाऊस; धरणात साडे पाच हजार क्यूसेकने आवक सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात नवजा येथे सर्वाधिक १४८ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे १३९ आणि महाबळेश्वरला ७४ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडे पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच सध्याही पूर्व भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झालाय. वापसा नसल्याने पेरणीला उशिरा होण्यास सुरूवात होऊ शकते. तसेच ओढ्यांना पाणी वाहत असून बंधारेही भरले आहेत. तर विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. तर पश्चिम भागात सुरूवातीला पाऊस झाल्यानंतर आठ दिवस उघडझाप होती. तुरळक प्रमाणातच पाऊस पडत होता. पण, बुधवारपासून पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. त्यामुळे येथून पुढील दिवस हे पावसाचेच असणार आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे जून महिन्यात आतापर्यंत ५५२ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तसेच महाबळेश्वरलाही एकूण ३६१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळासह पाटण तालुका आणि कांदाटी खोऱ्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

कोयना धरणात सुमारे साडे पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १५.६१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. १४.८३ ही टक्केवारी आहे. तर मागील १५ दिवसांपासून धरणातील विसर्ग बंद आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आदी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे.

गतवर्षी पाऊस अन् पाणीसाठाही कमी..

जिल्ह्यात पावसाला उशिरा सुरूवात झाली हाेती. २१ जूनपर्यंत कोयनेला फक्त ७७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर नवजा येथे ८३ आणि महाबळेश्वरला १०० मिलीमीटर पाऊस पडलेला. तर कोयना धरणात १०.८९ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा पाऊसही अधिक झाला आहे. तसेच कोयना धरणात पाणीसाठाही जादा आहे.

Web Title: The intensity of rain increased in Satara district, Navaja 148 mm while Mahabaleshwar recorded 74 mm rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.