सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे १२ दिवसानंतर बंद
By नितीन काळेल | Published: August 6, 2024 06:36 PM2024-08-06T18:36:05+5:302024-08-06T18:36:33+5:30
वीजगृहातूनच विसर्ग : नवजाला ९४ मिलिमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे कण्हेर, उरमोडीच्या दरवाजातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. तर मंगळवारी १२ दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाला सुरूवात झाली होती. पण, जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले नाही. मात्र, जुलै महिना उजाडल्यानंतर पावसाने थैमान घातले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस आॅगस्ट महिना उजाडेपर्यंत सुरू होता. यामध्ये जुलैच्या मध्यावर सलग १० दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे दरडी कोसळल्या, ओढे-नाल्यांना पूर आले. यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला. परिणामी पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढला. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागलेला.
मात्र, मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. आता धरणे भरुन घेण्यासाठी अनेक धरणांतील विसर्ग थांबविण्यात आला आहे. तर काही धरणांतून आवक पाहून अल्प प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त २५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे ९४ आणि महाबळेश्वरला २१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता नवजा येथे सर्वाधिक ४ हजार ८०० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ५९२ आणि कोयनानगर येथे ४ हजार १४६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर पश्चिम भागातीलच धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे आवकही कमी प्रमाणात होत आहे.
२५ जुलैला दरवाजे प्रथम उघडले..
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. यामुळे आवकही कमी आहे. त्यातच धरणात ८६ टीएमसीच पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. यासाठी सोमवारपासूनच धरणाच्या दरवाजातील विसर्ग ५० हजार क्यूसेकवरुन कमी करण्यास सुरुवात झाली. सोमवारी रात्री २० हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आलेला. तर मंगळवारी दरवाजे पूर्ण बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जातोय. तर दि. २३ जुलै रोजी पायथा वीजगृहातील विसर्ग सुरू झालेला. २५ जुलैला दरवाजातून यंदा पावसाळ्यात प्रथम पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी सुरूवातीला दीड फुटांनी सहा दरवाजे उघडून १० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २६ हजार ६३८ क्यूसेक वेगाने पाणी आवक होत होती.