सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच; कोयनेत ४० टीएमसीवर साठा
By नितीन काळेल | Published: July 21, 2023 12:36 PM2023-07-21T12:36:19+5:302023-07-21T12:36:42+5:30
महाबळेश्वरला १०३ मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरलाच सर्वाधिक १०३ मिलमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठ्याने ४० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. सध्या पावसाचा जोर कमी ओसरला असलातरी झाडे पडणे, दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.
पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढत गेला. तर मंगळवारी आणि बुधवारी धुवाॅधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी ३०० मिलमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच या जोरदार पावसामुळे कोकणला जोडणाऱ्या कुंभार्ली आणि पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. तसेच महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही दरडी कोसळली होती. तर इतर काही मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झालेली. यामुळे मागील तीन दिवस पश्चिम भागात अडचणींचा सामना करावा लागलेला.
मात्र, गुरुवारपासून पाऊस कमी होत गेला आहे. आज, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८४ मिलमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ९५ आणि महाबळेश्वरला १०३ मिलमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वरमध्ये २३३२ आणि नवजाला २३३१ मिलीमीटर पडला. तर कोयनेला १६४४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तरीही यावर्षी कोयनेला पाऊस कमी आहे. दरम्यान, या पावसामुळे पश्चिम भागातील ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले आहे. यामुळे भात लागणीला वेग आला आहे.
कोयनेत आवक कमी...
कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी होत चालली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ३७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणसाठा ४०.७८ टीएमसी झाला होता. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड...
पश्चिम भागातील महाबळेश्वर-तापोळा मार्गावर गुरुवारी दरड पडली होती. यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला. मात्र, प्रशासनाने युध्दपातळीवर काम करुन दरड हटविली. त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. तसेच याच मार्गावर वाघोरा येथे झाडही रस्त्यावर पडलेले. तेही बाजुला काढण्यात आले आहे. महाबळेश्वरजवळील प्रतापगड रस्त्यावर पडलेली दरडही काढून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.