सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेत २७५८ क्युसेक'ने पाण्याची आवक 

By नितीन काळेल | Published: June 24, 2024 06:50 PM2024-06-24T18:50:50+5:302024-06-24T18:51:18+5:30

तरीही नवजाचा पाऊस ७०० मिलिमीटरजवळ..

the intensity of rain is less In Satara district; Water inflow into Koyna Dam at 2758 cusecs | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेत २७५८ क्युसेक'ने पाण्याची आवक 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेत २७५८ क्युसेक'ने पाण्याची आवक 

सातारा : जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट मिळाला असला तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा पाऊस ७०० मिलिमीटरजवळ पोहोचलाय.

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेत झाले. त्यामुळे मागील १९ दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली. पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही पावसाने अजूनही म्हणावा असा जोर धरलेला नाही. मागील १० दिवसांपासून पश्चिम भागात तर पावसाची उघडझाप सुरू आहे. एखादा दिवस पावसाने जोर धरला तर नंतर उघडझाप होत आहे. परिणामी धरणात अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू नाही.

त्यातच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला प्रत्येकी ४ मिलिमीटर पाऊस झाला, तर एक जूनपासून कोयनानगर येथे ५२६ आणि महाबळेश्वरला ४४० मिलिमीटरची नोंद झाली, तर नवजा येथे आतापर्यंत ६७३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झाली आहे. त्यामुळे सावकाशपणे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला होता. टक्केवारीत हे प्रमाण १५.६६ आहे. तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

पश्चिम भागात पावसाची उघडझाप असली तरी पूर्वेकडे प्रमाण कमी झाले आहे. तरीही आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे, तसेच खते आणि बियाणे दुकानातही गर्दी होत आहे. पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

धरणांत कमी पाणीसाठा..

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदींसारखी महत्त्वाची धरणे आहेत. या प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीच्या वर आहे. सध्या या धरण क्षेत्रातही पाऊस कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात अजूनही मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा वाढू शकतो, तर गेल्या वर्षी कोयनेसह अनेक धरणे भरली नव्हती.

Web Title: the intensity of rain is less In Satara district; Water inflow into Koyna Dam at 2758 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.