सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: August 3, 2024 06:47 PM2024-08-03T18:47:07+5:302024-08-03T18:48:00+5:30

नद्यांच्या पातळीत वाढ : नीरा जुना पूल अन् वाठार-वीर रस्ता बंद

the intensity of rain is reduced In Satara district, water inflow continues in Koyna Dam | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरणात आवक कायम आहे. यामुळे धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे, तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठाही ८८ टीएमसीजवळ पोहोचला आहे.

पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून खंड न पडता पाऊस सुरू आहे. सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. सध्या बहुतांशी धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील छोटी धरणे पाठीमागेच भरून वाहत आहेत, तर इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ४९ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ५० हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८, नवजाला ६० आणि महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली, तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ९३७, नवजा येथे ४ हजार ६२७ आणि महाबळेश्वरला ४ हजार ३२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच वीरमधून विसर्ग वाढवला..

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच धरणाच्या वरील भागात असणाऱ्या नीरा देवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे, तसेच भाटघर १००, तर गुंजवणी धरणही ८७ टक्के भरले. या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री साडेदहापासून वीरमधील विसर्ग वाढविण्यात आला. धरण सांडव्याद्वारे ३२ हजारांवरून ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ लागलाय. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Web Title: the intensity of rain is reduced In Satara district, water inflow continues in Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.