अज्ञातांनी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटाच केल्या लंपास, पाटण तालुक्यातील निसरेमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:41 PM2022-04-13T16:41:24+5:302022-04-13T16:43:19+5:30
कऱ्हाड : निसरे, ता. पाटण येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्यामुळे संताप व्यक्त ...
कऱ्हाड : निसरे, ता. पाटण येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. प्लेटाच चोरीस गेल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
निसरे येथे शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी प्लेटा लावण्यात आल्या आहेत. १ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाचे कामगार पोपट चव्हाण हे बंधाऱ्याचे काम पाहण्यासाठी बंधाऱ्याजवळ गेले होते. त्यावेळी सर्व प्लेटा बंधाऱ्या जवळ व्यवस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुन्हा बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना बंधाऱ्याजवळ लोखंडी प्लेटा कमी असल्याचे आढळून आले.
त्यांनी पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी विश्वास कुलकर्णी यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी संबंधित अधिकारी व कामगार यांनी मिळून बंधाऱ्यानजीकच्या प्लेटांची मोजणी केली असता १ हजार १६२ प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्लेटा चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर शाखा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली. १८ हजार २०० रुपये किमतीच्या एकूण ९१ प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत पाटबंधारे विभागाचे मोजणीदार शांताराम दाजी चाळके यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.