कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले
By दीपक देशमुख | Published: April 13, 2024 04:14 PM2024-04-13T16:14:14+5:302024-04-13T16:17:17+5:30
महायुतीत सातारच्या जागेसाठी नेत्यांची अजूनही खलबते, धुसफूस सुरूच
दीपक देशमुख
सातारा : महायुतीच्या सातारा लोकसभा जागेच्या उमेदवारीबाबत घटक पक्षाच्या नेत्यांची अजूनही खलबते सुरू आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात नितीन पाटील यांच्या उमेदवारीची खात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. तर भाजपानेही शक्तिप्रदर्शन व महायुतीचे मेळावे घेतले आहेत; परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने घड्याळाचे काटे कमळाला टोचू लागल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे नरेंद्र पाटील यांनीही आपल्याला उमेदवारीबाबत अद्याप अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी करून महायुतीत प्रवेश केल्यानंतर सातारासह इतर चार जागांवर दावा सांगितला होता. तेव्हापासूनच राष्ट्रवादीतून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. अखेर त्यांचेच नाव राष्ट्रवादीकडून निश्चितही झाले; परंतु या जागेवर उदयनराजेंचाही दावा असल्याने उमेदवारीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. इतर जागांबाबत तोडगे निघत साताऱ्याचा तिढा राज्यातही गाजला.
उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन राजकीय कौशल्य पणाला लावले; तसेच दिल्लीहून येताच शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी असल्याचे जाहीर केले; परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप राज्यातील नेते दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. तर राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीत उमेदवारी निश्चित हाेत असतानाही भाजपाकडून ताणून धरले गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही नाराजीचा सूर आहे. निर्णय झाला नसल्याने त्यांचीही प्रचारासाठीची आगेकूच थांबली आहे.
महायुतीचे आणखी एक दावेदार नरेंद्र पाटील यांनीही व्यासपीठावरच आपली दिल्लीत ताकद कमी पडल्याचे बोलून दाखवत आपल्याला उमेदवारीबाबत आशा असल्याचे म्हंटले होते. या प्रमुख दावेदारांशिवाय जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली असल्यामुळे पडद्याआडूनही अनेकांनी फिल्डिंग लावलीय. त्यांचा जिल्ह्यात नसला तरी त्यांच्या भागापुरता राजकीय प्रभाव आहे. त्यांना शांत करता आले नाही तर या अटीतटीच्या झुंजीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. हे जाणून सर्वांचे रुसवेफुगवे काढून अगोदर महायुतीच्या वरातीमध्ये सामील करायचे आणि यानंतरच उमेदवारीचा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न सध्या तरी दिसतो आहे.
दाढी टोचणार की, गुदगुल्या होणार?
वाढदिवशी शुभेच्छा द्यायला आलेल्या शिवेंद्रराजेंची दाढी टोचते असे जरी उदयनराजे भोसले मिश्कीलपणे म्हणाले होते. शिवेंद्रराजेंची दाढी खरंच टोचणार की गुदगुल्या करणार, हे उमेदवारीबाबत निर्णय झाल्यानंतरच समजणार आहे. कारण दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्याप्रमाणे पक्षनिष्ठेला प्राधान्य देत अधिकृत उमेदवाराच्या पाठीमागे ताकद उभी करणार असल्याचे संकेत शिवेंद्रराजे यांनी दिले आहेत.