किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात; ग्रामस्थांना सुगावा लागण्यापूर्वीच बिबट्याला अन्यत्र हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 12:38 PM2022-01-26T12:38:13+5:302022-01-26T12:38:44+5:30
मलकापूर : किरपे ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्या अखेर जेरबंद झाला. २६ जानेवारी रोजी पहाटे ही बाब ...
मलकापूर : किरपे ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्या अखेर जेरबंद झाला. २६ जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर ग्रामस्थांना सुगावा लागण्यापूर्वीच वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.
किरपे ता. येथील गुरुवारी २० रोजी सायंकाळी किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर वनविभागाने तात्काळ हालचाली गतिमान करत परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्याने पिंजऱ्याला एक-दोन वेळा गुंगारा दिल्याचे दिसून आले. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात शनिवारी २२ रोजी ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.
मोवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बुधवारी २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकर, पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून घेतले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.