उघड्यावरचं रात्रीचं विश्व! कुट्ट अंधार आणि भयाण शांततेतही 'त्यांना' पोटाच्या भुकेचीच आस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:24 PM2022-03-25T12:24:33+5:302022-03-25T12:28:10+5:30
Satara News : साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणावरून अवघ्या चार वर्षाच्या मुलीला उचलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी पुढे आल्यानंतर ‘लोकमत’ने बुधवारी उघड्यावरचं रात्रीच्या विश्वात डोकावण्याचा प्रयत्न केला.
प्रगती जाधव-पाटील
सातारा - कुट्ट अंधारात संसारोपयोगी वस्तु ठेऊन मोकळ्या हवेत आणि लख्ख उजेडात झोपणाऱ्या फिरस्ता मुलांना आणि त्यांच्या कुटूंबाला जीवापेक्षाही पोटाची आग मोठी वाटते. सोमवारी घडलेल्या घटनेनंतरही अनोळखी कोणीही त्यांच्या जवळ गेले की ही मुलं हाताने खुणवून खायला आणलं का असा करूण प्रश्न करतात.
साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणावरून अवघ्या चार वर्षाच्या मुलीला उचलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी पुढे आल्यानंतर ‘लोकमत’ने बुधवारी उघड्यावरचं रात्रीच्या विश्वात डोकावण्याचा प्रयत्न केला. शहर परिसरातील असुरक्षित ठिकाणं शोधण्याबरोबरचं रात्रीत सुरू असलेल्या हालचालींचाही वेध घेतला.
सोमवारची घटना उघडकीस आल्यानंतर शहरात पोलिसांची गस्त वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे पडले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतरही फिरस्त्यांच्या आयुष्यातील अंधार मिटला नव्हताच. पोलिसांनी हुसकवल्यानंतर पार्किंगचा आसरा घेऊन पडणाऱ्यांना अद्यापही दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांना सतावतो.
‘सीसीटीव्ही’च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह!
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर व परिसरात सर्रास सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, कॅमेऱ्याच्या कक्षेत येणाऱ्याचा चेहरा, गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नाही. पोलिसांनी १३४ कॅमेरे तपासूनही त्यांच्या हाती काहीच ठोस न लागल्याने सीसीटीव्हीच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्यसनांच्या अंमलात बाप आईचं अस्तित्वचं नाही!
दिवसभर हाताला काम मिळाले तर काम करणे किंवा नशा करून दिवस काढणे ही फिरस्ता समाजातील पुरूषांची दिनचर्या असते. व्यसनाच्या अंमलातच कुटूंबात येणं आणि त्यांच्याच शेजारीच पडून राहणे ही कुटूंबातील पुरूषांची भूमिका. व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून यांच्यातील अनेकांच्या पत्नीही अन्यत्र गेल्याने मुलांचे हाल होतात. व्यसनांच्या अंमलात बाप आणि आईशिवाय जगणारी ही मुलं विकृतांच्या नजरेत लगेच भरतात.
गुरफटून झोपलं की बाई-बाप्या कळत नाही
टीम ‘लोकमत’ने बुधवारी रात्री शहरात रस्त्याकडेला झोपलेल्यांशी संवाद साधल्यानंतर अचंबित करणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले. ती महिला उंबऱ्याची उशी करून झोपली होती. झोपडी असताना उघड्यावर का झोपलाय कोणी काही केलं तर असा प्रश्न केला. त्यावर, ‘अंगावर घेऊन गुरफटून झोपलं की बाई-बाप्या कळत नाही’, असं उत्तर त्यांनी दिले.
घटना घडल्यानंतर फिरस्ते गायब
सोमवारी पहाटे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर हे फिरस्ते त्यांच्या नेहमीच्या ठिकाणावर नसल्याचे लक्षात आले. त्यांच्याविषयी अधिक माहिती घेतली असता ही दोन दिवसांपासून अचानकच आपला संसार गुंडाळून अन्यत्र गेल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर पोलिसांची वाढलेली रात्रगस्तीने उशीरा प्रवास करणाऱ्यांना आधार दिला आहे.
माझी मुलगी फार्मासिस्ट असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत नाक्यावरील आमचे मेडिकल सुरू असते. सोमवारची घटना घडल्यानंतर तिचे दुकानात थांबणे धोक्याचे वाटतेय. तिने एकटीने घरी जाण्याचीही रिस्क घ्यायला नको म्हणून मी सोडून येतो. या प्रकारामुळे माझ्यासारखे अनेक पालक चिंतीत झाले आहेत. वर्षानुवर्षे आमच्या शेजारच्या रिकाम्या जागेत मुक्काम करणारे हे लोक सोमवारपासून दिसलेच नाहीत.
- राजेश पवार, मेडिकल व्यावसायिक, सातारा
धोका इथला संपत नाही!
राजवाडा परिसर
शहर बसस्थानक परिसर
राधिका रोड
राजपथ
मार्केट यार्ड
बॉम्बे रेस्टॉरंट चौक
गोडोली नाका
गणेश चौक
अर्कशालानगर