साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:07 IST2022-07-29T14:07:00+5:302022-07-29T14:07:22+5:30
खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते.

साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास
बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा (कोअर) क्षेत्रात आणि कोयना धरणाच्या पलीकडील बाजूस असलेल्या खिरखंडी गावातील मुलांना शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून होडी चालवीत शाळेला जावे लागत होते. याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनाने विद्यार्थ्यांची आश्रमशाळेमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली आहे, तर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी उपाययोजन करण्यास सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सहाय्यक बन संरक्षक सुरेश साळुंखे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, राम पवार, विजय देशमुख,अशोक मनुकर, दीपक भुजबळ आदी उपस्थित होते.
जावळी तालुक्यात खिरखंडी गाव आहे. या गावामध्ये पूर्वी ७० कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे ठाणे जिल्ह्यातील एकसाल सागाव (ता. भिवंडी) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि पुनर्वसन झाल्यानंतरही ७० पैकी ६ कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही. एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु, या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्य:स्थितीत सात कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता खिरखंडीत वास्तव्यास आहेत.
पालकांचे मन वळविण्यात प्रशासनाला यश
खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना लाँचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थी आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली, या प्रयत्नांना यश आले आहे.
सध्या खिरखंडी ग्रामस्थ येथे खूप वाईट परिस्थितीत राहत असून, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावत आहे. आम्ही त्यांची नजीकच्या आश्रम शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्नही येत्या आठ दिवसांत कायमचा मार्गी लावणार आहे. - रुचेश जयवंशी - जिल्हाधिकारी, सातारा