लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे!, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण
By प्रमोद सुकरे | Published: January 6, 2023 06:29 PM2023-01-06T18:29:26+5:302023-01-06T18:30:26+5:30
शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : तब्बल २ वर्षानंतर नागपुरला विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. मात्र, या सरकारने ते २ आठवड्यात गुंडाळले. लोकायुक्त सुधार विधेयक घाईगडबडीत पारीत केले. अशा प्रकारे विधेयके पारीत करणे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. तसेच सदरचे विधेयक विधान परिषदेत फेटाळले आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेला यावे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाडमध्ये शुक्रवारी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कऱ्हाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील नव्या सरकारवर सुप्रिम कोर्टाची टांगती तलवार कायम आहे. त्यांना अजुन मंत्रीमंडळ विस्तारही पुर्ण करता आलेला नाही. घटनेतील तरतुदीनुसार १० ब या परिशिष्टाचे त्यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल महत्वाचा ठरणार आहे. येत्या १३ तारखेला काय निर्णय घेतला जातोय, हे पहावे लागेल.
महाराष्ट्रातील प्रकल्प मोठ्या प्रमाणावर बाहेर जात आहेत. गुजरातला प्रकल्प का जात आहेत, याचे समाधानकारक उत्तर या सरकारला देता येत नाही. तर केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे. सध्या भारताने आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक जास्त कर्ज घेतले आहे. करामध्ये भरपूर वाढ करुन जनतेला लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.
ते लोकसभेतही चर्चा करीत नाहीत!
मध्यंतरी चिनने भारताचा मोठा भुभाग लाटला आहे. मात्र, मोदी म्हणतात तसे काही घडलेलेच नाही. लोकसभेत चिनच्या अतिक्रमणाबाबत चर्चा करा म्हटलं तर ते चर्चाही करीत नाहीत. चर्चा करायला त्यांना काय अडचण वाटते, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
ते का सांगत नाहीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचे सांगतात. मात्र, दरडोई उत्पन्नाच्या यादीत भारत १७७ व्या क्रमांकावर आहे, हे ते का सांगत नाहीत, असा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला.
यांच्यावर काही परिणामच दिसत नाही!
आमच्या अडीच वर्षाच्या काळात एका मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर त्याने राजिनामा दिला. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात चार ते पाच मंत्र्यांवर आरोप झाले. तरीही त्यांच्यावर काही परिणामच दिसत नाही. आता त्या-त्या प्रकरणातील आणखी पुरावे जमा करण्याचे आमचे काम सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले.
आता हाथसे हाथ जोडो अभियान
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभर चांगली चालली आहे. ती २६ जानेवारीला श्रीनगर येथे संपणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यात' हाथसे हाथ जोडो 'अभियान राबविणार आहोत. आमचे कार्यकर्ते काँग्रेसची भुमिका मांडण्यासाठी गावागावात आणि घराघरात पोहोचणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले.
निकाल मान्य करावाच लागेल
महाराष्ट्र व कर्नाटक सिमा वादाबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, खरंतर हा वाद न्यायालयात आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री आम्ही एक इंचही जमिन देणार नाही, अशी सिंहगर्जना करतात. तर आमचे मुख्यमंत्री इंच इंच जमिनीसाठी लढू, असे सांगतात. मात्र, याबाबत न्यायालय काय निर्णय देईल तो सर्वांनाच मान्य करावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.