साताऱ्यातील उड्डाणपुलांचे रुपडे पालटणार, उड्डाणपुलात कास अन् आर्मीची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:32 PM2022-06-01T17:32:34+5:302022-06-01T17:32:58+5:30

वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट आणि अजिंठा चौकातील पुलांना वेगळा लूक देण्यात येणार आहे.

The look of the flyovers in Satara will be changed | साताऱ्यातील उड्डाणपुलांचे रुपडे पालटणार, उड्डाणपुलात कास अन् आर्मीची प्रतिकृती

साताऱ्यातील उड्डाणपुलांचे रुपडे पालटणार, उड्डाणपुलात कास अन् आर्मीची प्रतिकृती

Next

दीपक शिंदे

सातारा : महामार्गावरील वाहतूक शहरात आल्याने शहरातील वाहतूक कोलमडू नये यासाठी महामार्गावर करण्यात आलेल्या उड्डाणपुलांना आता वेगळे रूपडे प्राप्त होणार आहे. अतिक्रमण आणि अवैध व्यवसायांसाठी होत असलेला वापर पाहता, आता नगरपालिकेने या उड्डाणपुलांचा विकास करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून, काही दिवसांतच या कामांना सुरुवात होणार असल्याचे नगरपालिकेचे प्रशासक अभिजीत बापट यांनी सांगितले. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट आणि अजिंठा चौकातील पुलांना वेगळा लूक देण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई, सांगली-कोल्हापूर रस्त्याने सातारा शहरात येण्याऐवजी उड्डाणपुलांच्या माध्यमातून बाहेरच्या बाहेर जाता येते. हा प्रवास अधिक गतिमान होतो आणि शहरात न येण्यामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत नाही. पण उड्डाणपूल तयार करण्यात आल्यानंतर त्यांच्या खाली बाहेरील राज्यातील लोकांनी ठाण मांडले आहे. छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक निवाऱ्यासाठी या उड्डाणपुलांचा वापर करतात. त्याबरोबरच अनेक अतिक्रमणेही होत असतात. यावर उपाय म्हणून नगरपालिकेने आता या ठिकाणी गार्डन आणि वेगवेगळ्या थिमच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, ही ठिकाणे सुंदर पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत.

सातारा नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेतला असून, याबाबत स्वाती पाटील या प्रसिद्ध आर्किटेक्टकडून ले-आऊट बनविण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी काय करण्यात यावे, याबाबतचेही नियोजन झाले आहे.

अजिंठा चौकात : आर्मी कॅम्प - कोडोली - रहिमतपूरकडून शहरात येण्यासाठी ज्या उड्डाणपुलाखालून यावे लागते त्या अजिंठा चौकातील पुलाखाली आर्मी कॅम्प तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी काही रणगाडे आणि लष्करी वाहनेही ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण पुलाला आर्मी कलर करण्यात येणार असून या ठिकाणी गार्डन्सही करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

वाढे फाटा : येथील चौकात कासचे पुष्पवैभव उभारण्यात येणार असून या ठिकाणी विविध रंगाची फुले, फुलपाखरे, पक्षी हे साकारण्यात येणार आहेत. त्याबरोबरच बसण्यासाठीही जागा करण्यात येणार असून या ठिकाणी फिरताही येणार आहे. तसेच टॉयलेट्सचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

बॉम्बे रेस्टॉरंट चौक : या ठिकाणी ग्रीन गार्डन उभारण्यात येणार आहे. लोकांना फिरण्यासाठी ट्रँकची व्यवस्था करण्यात येणार असून आरटीओची नियमावलीही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. लोकांनी बसल्या बसल्या आरटीओचे नियम वाचावेत आणि त्याप्रमाणे वर्तन करावे असे अपेक्षित आहे.

शहरात प्रवेश करताना उड्डाणपूल ही शहराची प्रवेशद्वारे झाली आहेत. त्यामुळे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याची पालिकेची संकल्पना होती. त्याला लवकरच मूर्त स्वरूप मिळणार असून तिनही उड्डाणपुलांना वेगळ्या पद्धतीने तयार करत आहोत. पेंटिंगच्या माध्यमातून विविध संकल्पना या ठिकाणी साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  - अभिजित बापट, प्रशासक, सातारा नगरपालिका
 

आम्ही सतत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. पोवई नाक्यावरही शिवसृष्टी साकारण्याचा आम्ही वेगळा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणीही तिन्ही उड्डाणपुलांच्या खाली नावीन्यपूर्ण गार्डन करण्यात येणार असून ट्रँकही बनविण्यात येणार आहेत. त्याचा सातारकरांना निश्चितच फायदा होईल.  - स्वाती पाटील, आर्किटेक्ट, सातारा

Web Title: The look of the flyovers in Satara will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.