बँकेत घुसून व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार, कऱ्हाडातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:44 PM2024-11-01T12:44:31+5:302024-11-01T12:45:21+5:30

संशयिताने कर्जासाठी केला होता अर्ज; हल्ल्यात व्यवस्थापक गंभीर

The manager was stabbed in the head by breaking into the bank in karad | बँकेत घुसून व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार, कऱ्हाडातील घटना 

बँकेत घुसून व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार, कऱ्हाडातील घटना 

कऱ्हाड : शेळीपालन कर्जाबाबत माहिती विचारण्यासाठी बँकेत आलेल्या युवकाने बँक व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. येथील भेदा चौकानजीक असलेल्या इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे.

दरम्यान, संशयित युवकाने मानेच्या दिशेने केलेला कोयत्याचा वार बँक व्यवस्थापकाने हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात व्यवस्थापकांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आशिष जी कश्यप (वय ४४, सध्या रा. बनपुरी कॉलनी, कऱ्हाड, मूळ रा. बाकीपूर पाटणा, बिहार) असे जखमी बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी आशितोष दिलीप सातपुते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ओवरसीज बँकेची कऱ्हाडातील भेदा चौकानजीक शाखा आहे. या शाखेत आशिष कश्यप हे जुलै २०२४ पासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. रेठरे बुद्रुक येथील उज्ज्वला सातपुते यांनी शेळी पालनासाठी कर्ज मिळावे, यासाठी ओवरसीज बँकेच्या शाखेकडे अर्ज केला होता. या कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी उज्ज्वला सातपुते व त्यांच्यासोबत प्रदीप कांबळे हे दोघे तीन दिवसांपूर्वी बँकेत आले होते. त्यावेळी व्यवस्थापक आशिष कश्यप यांनी त्या दोघांना कर्ज प्रकरणाबाबतची सर्व माहिती दिली. त्यानंतर उज्ज्वला सातपुते यांचा मुलगा आशितोष हा याच कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बुधवारी बँकेत आला होता. त्यावेळी कश्यप यांनी त्याला कर्ज प्रकरणाची सर्व माहिती आईला दिली असून, तुम्ही अर्जदार नसल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले.

काही वेळाने चिडून जात आशितोष याने कश्यप यांच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी कोयत्याचे दोन वार कश्यप यांच्या डोक्यावर लागले आहेत. तर अन्य दोन वार मानेच्या दिशेने करण्यात आले होते. मात्र, कश्यप यांनी वेळीच हात मध्ये घातल्याने ते बचावले. या घटनेनंतर संशयित आरोपी तेथून निघून गेला. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कश्यप यांनी रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे.

शर्टातून लपवून आणला कोयता..

संशयित आरोपी आशितोष याने बँकेत येतानाच शर्टात लपवून कोयता आणला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हल्ल्यावेळी बँकेतील अन्य कर्मचारी कश्यप यांच्या मदतीला धावले. याचवेळी कश्यप यांनी स्वत:ला जुन्या रेकॉर्ड असलेल्या खोलीत कोंडून घेतल्याने ते बचावले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: The manager was stabbed in the head by breaking into the bank in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.